जुन्नर तालुक्यात स्थानिक पातळीवर नवीन आघाडी निर्माण होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:00 IST2025-11-01T16:48:53+5:302025-11-01T17:00:07+5:30
मागील निवडणुकीत ७ गट व १४ गण होते. पण यंदा जिल्हा परिषदेतील आठ गटांपैकी केवळ दोन गट पुरुषांसाठी असून सहा गट महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.

जुन्नर तालुक्यात स्थानिक पातळीवर नवीन आघाडी निर्माण होणार?
जुन्नर : २०१७ मध्ये झालेल्या मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मुदत संपल्यानंतर तीन वर्षे झाली असून, तालुक्यातील सर्व इच्छुक पक्ष आणि उमेदवार निवडणुकीची वाट पाहत आहेत. मात्र, आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांच्या आकांक्षा अपुऱ्या राहिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत जिल्हा परिषदेसाठी एकूण ७३ जागांसाठी निवडणूक होत आहे, ज्यात ३७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यापैकी जुन्नर तालुक्यातील आठ जागांपैकी सहा जागा महिलांसाठी राखीव आहेत.
जिल्हा परिषदेसाठी जुन्नर तालुक्यात एकूण ८ गट आहेत, तर पंचायत समितीसाठी १६ गण आहेत. मागील निवडणुकीत ७ गट व १४ गण होते. पण यंदा जिल्हा परिषदेतील आठ गटांपैकी केवळ दोन गट पुरुषांसाठी असून सहा गट महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना महिला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पुरुष उमेदवारांच्या केवळ दोनच जागा असल्यामुळे अनेक उमेदवारांना हानी झाली आहे. परिणामी, इच्छुक पुरुष उमेदवारांनी आपल्या घरातील महिलांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहील की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अतुल बेनके रिंगणात असतानाच घटक पक्षातील काही उमेदवारांनी बंडखोरी केली होती. या निवडणुकीतही आमदार शरद सोनवणे व माजी आमदार अतुल बेनके यांच्यात राजकीय वर्चस्वासाठी जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षही स्वतःचे प्रतिमान सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार समोरासमोर उभे राहण्याची जास्त शक्यता आहे.
महाविकास आघाडीने मागील विधानसभा निवडणुकीत एकजिनसपणे काम केले होते; अशा परिस्थितीची वाट पाहणाऱ्या मतदारांना यंदाही अशाच काही अपेक्षा आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या स्थानिक नेतृत्वाने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे महायुती किंवा महाविकास आघाडी व्यतिरिक्त स्थानिक पातळीवर नवीन आघाडी निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही उमेदवार पक्ष बदलण्याचा विचार करत आहेत. पंचायत समितीतील १६ जागांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे सर्व पक्ष महिलांना मिळणाऱ्या संधीसाठी सक्षम उमेदवार शोधण्यात वेगाने लागले आहेत.
जुन्नर तालुक्यातील सावरगाव-कुसुर जिल्हा परिषद गटातील निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. या सामान्य गटात भाजप नेता आशाताई बुचके, जिल्हा बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे, माजी गुलाबराव पारखे, संतोष चव्हाण, संध्याताई भगत यांसारखे प्रबळ उमेदवार नशीब अजमावणार आहेत. आळे-पिंपळवंडी गट सामान्य असल्यामुळे येथेही कडक स्पर्धा आहे; विजय कुरहाडे, मंगेश अण्णा काकडे यांसारखे उमेदवार इच्छुक आहेत. बोरीबुद्रूक-खोडद गट इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असून जयश्री खंडागळे, कल्पना काळे आणि अनेक अन्य उमेदवार इच्छुक आहेत. राजुरी-बेल्हे गटात स्नेहल शेळके, स्मिता कणसे, शांता गवळी, वर्षा पिंगट, प्रमिला घंगाळे यांचा सहभाग अपेक्षित आहे. तांबे बारव गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असून, माई लांदे, सुमन लांदे, सुनीता बोऱ्हाडे आणि अनेक अन्य उमेदवार इच्छुक आहेत. नारायणगाव-वारूळवाडी गट इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असून नेहा पाटे, प्रियंका शेळके यांचा सहभाग आहे. ओतूर-धालेवाडी गट इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव असून छाया तांबे, अक्षदा पानसरे, प्रज्ञा तांबे यांसारखे उमेदवार इच्छुक आहेत.
२०१७ च्या निवडणुकीतील चित्र
जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी - ४, शिवसेना - ३
पंचायत समिती गण : शिवसेना - ७, राष्ट्रवादी - ६, काँग्रेस - १ (शिवसेना-काँग्रेस युतीने सभापती-उपसभापती पदे पटकावली)