पत्नीचा कोरोनाने मृत्यू; नैराश्यातून पतीनेही गळफास घेत संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 22:12 IST2021-06-28T22:08:48+5:302021-06-28T22:12:14+5:30
हे गृहस्थ आपल्या पत्नीसह पंजाबला गेले असताना तिथे त्यांच्या पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाला होता.

पत्नीचा कोरोनाने मृत्यू; नैराश्यातून पतीनेही गळफास घेत संपवलं जीवन
पिंपरी : पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आलेल्या नैराश्यातून एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संत तुकाराम नगर, पिंपरी येथे सोमवारी (दि. २८) ही घटना घडली.
कुलदीपकसिंग जागीरसिंग हंस (वय ५०, रा. संत तुकारामनगर, पिंपरी), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हंस यांच्या आईवडिलांचे निधन झाले आहे. तसेच ते त्यांच्या पत्नीसह त्यांच्या मूळगावी पंजाब येथे गेले होते. तेथे त्यांच्या पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे हंस हे नैराश्यात होते. त्यातून त्यांनी घरात एकटे असताना डाव्या हाताची नस कापून घेतली. त्यानंतर घरातील पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या भावाच्या मुलाने सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या घरी आला असता दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. त्यावेळी भाडेकरूकडून चावी घेऊन दरवाजा उघडला असता, घरात हंस यांनी गळफास घेतला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे तपास करीत आहेत.