Pimpri Chinchwad: भावाच्या विरोधात तक्रार दिल्याने पत्नीचा काढला काटा; पतीसह महिलेला अटक
By प्रकाश गायकर | Updated: January 20, 2024 18:03 IST2024-01-20T18:02:47+5:302024-01-20T18:03:05+5:30
ही घटना मंगळवारी (दि.१६) सकाळी दहा ते अकरा या कालावधीत घडली. सुनंदा लक्ष्मण चव्हाण (वय २७) असे मयत महिलेचे नाव आहे...

Pimpri Chinchwad: भावाच्या विरोधात तक्रार दिल्याने पत्नीचा काढला काटा; पतीसह महिलेला अटक
पिंपरी : भावाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली म्हणून घरच्यांसोबत संगनमत करून डोक्यात दगड घालत स्वतःच्याच पत्नीची हत्या केली. तसेच तिचे प्रेत शेतात पुरल्याचा धक्कादायक प्रकार मावळमधील चांदखेड येथे घडला. ही घटना मंगळवारी (दि.१६) सकाळी दहा ते अकरा या कालावधीत घडली. सुनंदा लक्ष्मण चव्हाण (वय २७) असे मयत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी शिरगाव परंदवाडी पोलिस ठाण्यात मयत महिलेचा भाऊ शाम नामदेव चव्हाण (वय २८, रा. भोर, पुणे) यांनी शुक्रवारी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शिरगाव परंदवाडी पोलिसांनी पती लक्ष्मण रामभाऊ चव्हाण (वय ३२) व महिला आरोपी यांना अटक केली आहे. तर दीर गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीचा फोन लागत नाही तसेच ती घरी नाही म्हणून मयत महिलेच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सासरच्यांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली असता हा सारा प्रकार उघडकीस आला. आरोपी गणेश हा मयत महिलेचा दिर होता. त्याच्या विरोधात मयत महिलेने तीन वर्षापुर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक केले होते. याच रागातून आरोपींनी सुनंदा यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी चांदखेड येथील डोंगरालगत असलेल्या जमिनीमध्ये प्रेत पुरले.
सुनंदा या सापडत नसल्याने तिच्या घरच्यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांच्या तपासामध्ये गुन्ह्याची उकल झाली. सर्व सत्य समोर येताच पोलिसांनी पती लक्ष्मण चव्हाण आणि एक महिला आरोपीला बेड्या ठोकल्या. याचा पुढील तपास शिरगाव परंदवाडी पोलीस करत आहेत.