आयुष्यभराची कमाई घरासाठी लावली, घरे पाडल्यानंतर आम्ही जायचे कुठे? नागरिकांचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:43 IST2025-05-17T15:42:10+5:302025-05-17T15:43:15+5:30
चिखलीतील इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांचा टाहो, महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी; दुसऱ्या दाव्याच्या संदर्भात निर्णय; पण भरडले जातोय आम्ही!

आयुष्यभराची कमाई घरासाठी लावली, घरे पाडल्यानंतर आम्ही जायचे कुठे? नागरिकांचा टाहो
पिंपरी : ‘आयुष्यभराची कमाई घर उभारण्यासाठी लावली, आता निळ्या पूररेषेत आहे, असे सांगून त्यावर कारवाई केली जात आहे. आम्ही कोणाला फसवले नाही. आमची फसवणूक झाली आहे. आता, आम्ही जायचे कुठे?’ असा संतप्त सवाल चिखली येथील इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांनी केला आहे.
चिखलातील इंद्रायणी नदीकाठच्या घरांवर कारवाई होणार आहे. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाबद्दल आणि भ्रष्ट व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त केला. ही कारवाई अन्यायकारक आहे. साहित्य काढण्यासाठी वेळही दिला नाही. शुक्रवारी वीज, पाणी तोडण्यासाठी महापालिका अधिकारी गेले असताना नागरिकांनी माध्यमांसमोर टीका केली.
पावसात साहित्य हलविण्याची तारांबळ
शनिवारी कारवाई होणार असल्याने पावसातही येथील घरातील साहित्य हलविण्यासाठी धावपळ सुरू होती. नागरिकांनी संताप व्यक्त केला. येथील प्रत्येक माणूस श्रीमंत नाही. गोरगरिबांची फसवणूक झाली आहे, ज्यांनी फसवणूक केली. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. आज आमचे घराचे पाणी तोडले, हा अन्याय आहे, आम्ही चुकीचे होतो तर पाच वर्षे प्रशासन झोपले होते का? नदीपात्रातील बांधकामांच्या जागा कुणी विकल्या. तेथे बंगल्यांचे डिझाइन करणारे कोण, त्यांना वीज, पाणी, ड्रेनेजची सुविधा देणारा अधिकारी कोण? याचा शोध घेऊन कारवाई केली पाहिजे, असा संताप महिलांनी व्यक्त केला.
मी चार वर्षांपूर्वी या ठिकाणी जागा घेतली. त्यावेळी येथे रहिवासी झोन आहे, असे सांगितले होते. त्यानंतर सर्व वीज, पाणी अशा परवानगी घेतल्या. महापालिकेच्या वतीने कर भरून घेतला. आता आमच्या घरांवर कारवाई होत आहे. आमच्या परिसरामध्ये कोणीही भराव टाकून बांधकाम केले नाही. याबद्दल न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाची दिशाभूल केली. आमच्यावर अन्याय केला जात आहे. - महेश पाटील, नागरिक
गोरगरीब नागरिकांनी या ठिकाणी घरे उभारली आहेत. आता त्या ठिकाणची घर पाडण्याचे आदेश दिले जात आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारचा वेळ मिळू न देता महापालिका प्रशासनाच्या वतीने अन्यायकारक कारवाई सुरू आहे. आम्हाला फसवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. - गणेश खुळे, नागरिक
२०१८ पासून येथील प्रश्न चर्चेत आला आहे. आमच्या भागातील नागरिकांनी कुठेही चुकीचे काम केले नव्हते. दुसऱ्या दाव्याच्या संदर्भात निर्णय झाला आहे. आमच्या जवळच असणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या संदर्भात न्यायालयाने निर्णय दिला आणि कारवाई आमच्यावरही होत आहे. या भागात आम्ही कोणीही भराव टाकलेला नाही. आमच्या जागा चुकीच्या होत्या, तर मग नोंदणी कशी झाली? आमची फसवणूक झाली आहे. - जयवंत कुदळे, नागरिक