वाकडच्या काळखडक झोपडपट्टीत गुंडांचा धुडगुस; वाहनांची तोडफोड, मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 23:47 IST2018-11-25T23:46:38+5:302018-11-25T23:47:22+5:30
जुन्या भांडणाची खुन्नस काढून अंधाधुंद लाठीने मारहाण; एका अल्पवयीन मुलीसह तीघे गंभीर जखमी

वाकडच्या काळखडक झोपडपट्टीत गुंडांचा धुडगुस; वाहनांची तोडफोड, मारहाण
वाकड : जुन्या भांडणाची खुन्नस काढत हातात तलवारी, कोयते आणि काठया घेऊन सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने दिसेल त्याला मारहाण व वाहनांची तोडफोड केली. तर काहींच्या घरात घुसून संसारपयोगी वस्तूंची नासधूस केली. हा प्रकार वाकड काळखडक झोपडपट्टीत रविवारी (दि २५) रात्री नऊच्या सुमारास घडला. या प्रकाराने झोपडपट्टीवासीय प्रचंड दहशतीखाली असून सर्वजण भयभीत झाले आहेत. याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या तोडफोडीत आठ दुचाकींचे नुकसान करण्यात आले तर रस्त्याने जाणाऱ्यांवर अंधाधुंद काठी हल्ला करण्यात आला या मारहाणीत पूर्वा गुंजाळ (वय ३) या बालिकेसह दिलीप पेटे (वय ६०), शांताबाई जाधव (वय ५०, रा सर्वजण काळाखडक) यांच्यासह अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. एवढेच नव्हे तर त्या गुंडांनी अमानुषपनाचा कळस करीत काहींच्या घरात घुसून संसारपयोगी समान घराबाहेर फेकले. वस्तूंची तोडफोड करीत दहशत माजविली. घटनेनंतर दाखल झालेल्या वाकड पोलिसांनी पंचनामा करून आरोपींची नावे देखील मिळविली आहेत.
याबाबत माहिती अशी रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने झोपडपट्टीत बऱ्यापैकी गजबज होती. सर्वजण आपल्याला विश्वात दंग असतानाच आरडा ओरडा करीत हातात तलवारी, कोयते आणि काठया घेऊन सुमारे २० ते २५ जणांचे टोळके मुख्य रस्त्यावरून म्हातोबा मंदिराच्या दिशेने शिरले. रस्त्याच्या कडेला थांबविलेल्या दुचाकींची तोड फोड केली तर दिसेल त्याला मारहाण केली. यात सुमारे चारजण जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र पळापळ सुरू झाली. सीसी टीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहचत असून काहींच्या मागावर देखील ते आहेत.