चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 20:35 IST2018-07-13T20:34:34+5:302018-07-13T20:35:37+5:30
चिंचवड शहरात महिनाभरानंतर सातत्याने तोडफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.

चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच
पिंपरी : चिंचवड शहरात सुरु असलेले वाहनांच्या तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबत नाही. तसेच या घटनांमधून आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच प्रकार शुक्रवारी (दि. १३जुलै) पहाटे मोहननगर परिसरात तीन जणांनी सात वाहनांची तोडफोड केली. महिनाभरानंतर सातत्याने तोडफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन आलेल्या तिघा जणांच्या हातात कोयते होते. त्यांनी मोहननगर परिसरात उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडफोड करणाऱ्या आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी १८ जूनला भोसरी परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, शुक्रवारी घडलेल्या घटनेतील आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.