वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
By किरण शिंदे | Updated: May 25, 2025 12:38 IST2025-05-25T12:37:27+5:302025-05-25T12:38:07+5:30
या गाडीच्या माध्यमातून आरोपी कोणत्या-कोणत्या भागात गेले, कोणत्या लोकांशी संपर्कात होते, याचा तपास केला जात आहे.

वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
पुणे - जिल्ह्यातील गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे यांनी वापरलेली बलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे.
17 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे यांचा मुलगा, सुशील हगवणे, हा फरार झाला होता. फरारी अवस्थेत असताना त्याने याच बलेनो गाडीचा विविध ठिकाणी प्रवासासाठी वापर केला होता. त्यामुळे ही गाडी तपासात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
बावधन पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली असून, आता पुढील तपासासाठी वाहनाची सखोल चौकशी केली जाणार आहे. या गाडीच्या माध्यमातून आरोपी कोणत्या-कोणत्या भागात गेले, कोणत्या लोकांशी संपर्कात होते, याचा तपास केला जात आहे.
याशिवाय, राजेंद्र हगवणे यांनी फरार काळात आणखी कोणती वाहने वापरली, हे जाणून घेण्यासाठी बावधन पोलीस सखोल तपास करत आहेत. या तपासातून आणखी काही धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून सुशील हगवणेचा शोध सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
लग्नात दिली होती चांदीची भांडी
वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नात पितळी किंवा इतर धातूची भांडी घेण्यास नकार देण्यात आला होता. त्याऐवजी चांदीच्या भांड्यांची मागणी केली होती. त्यानुसार लग्नात चांदीची भांडी दिली, असे वैष्णवीच्या आईवडिलांनी सांगितले होते. पोलिसांनी हीच चांदीची भांडी जप्त केली आहेत.
नीलेश चव्हाणच्या मागावर तीन पथके
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी करण्यात आलेला नीलेश चव्हाण हा फरार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची तीन पथके त्याच्या मागावर असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.