वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
By नारायण बडगुजर | Updated: May 21, 2025 21:00 IST2025-05-21T21:00:00+5:302025-05-21T21:00:24+5:30
सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे पसार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
पिंपरी : जमीन खरेदी करण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या पती, सासू व नणंद यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी (दि. २१) न्यायालयात हजर केले. तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ करीत २६ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष असणारा सासरा आणि दीर अद्याप मोकाट आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
वैष्णवी शशांक हगवणे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वैष्णवी यांचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे अशी पोलिस कोठडीत वाढ झालेल्या संशयितांची नावे आहेत. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे पसार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्यही आहे.
वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी (१६ मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात ५१ तोळे सोने, फॉरच्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसा पासून शशांक व तिचे सासु सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण केले. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी शशांक यांची आई लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरुन वैष्णवी हिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वैष्णवीला तिच्या सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणे चालू केले होते. वैष्णवी हिचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी यांना क्रूर वागणूक दिली. तिच्या मृत्यूस कारणीभूत झाले, तिच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आले.
पोलिसांकडून बँकेला पत्र
बावधन पोलिसांनी याप्रकरणी संशयित हगवणे कुटुंबियांकडील फाॅरच्युनर कार आणि दुचाकी जप्त केली आहे. तसेच हगवणे कुटुंबियांनी बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. संबंधित बँकेकडे पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे. साेने तारण प्रकरणात यापुढे व्यवहार करताना पोलिसांना माहिती देण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.
या प्रकरणात सध्या हुंडाबळी व मृत्यूस कारणीभूत या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनाचा व्हिसेरा राखून ठेवला असून शवविच्छेदन अहवालात काही निष्पन्न झाल्यास त्यानुसार कलमवाढ करण्यात येईल. -विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त