Pimpri Chinchwad Rain | अवकाळी पावसाने पिंपरी-चिंचवड शहराला दुसऱ्या दिवशीही झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 12:00 IST2023-03-17T11:57:46+5:302023-03-17T12:00:15+5:30
चिंचवड परिसरात पावसाने झाड पडले होते...

Pimpri Chinchwad Rain | अवकाळी पावसाने पिंपरी-चिंचवड शहराला दुसऱ्या दिवशीही झोडपले
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगर आणि मावळ, मुळशी परिसरात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. गारांचा पाऊस पडला. दुसऱ्या दिवशीही गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने शहरवासीयांना झोडपले. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर चिंचवड परिसरात पावसाने झाड पडले होते.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रात्री वातावरणात गारवा जाणवत होता. गुरुवारी दुपारपासून वातावरणात बदल जाणवून येत होता. उकाडा जाणवत होता. सायंकाळी चारनंतर आकाशात ढग यायला सुरुवात झाली. त्यानंतर ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजाही चमकू लागला. वादळी वारा वाहू लागला. त्यामुळे चिंचवड तानाजीनगर परिसरातील रस्त्यावर झाड पडले होते.
पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, मोशी, चऱ्होली, चिखली, तळवडे, ताथवडे, वाल्हेकरवाडी, रावेत, किवळे, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, सांगवी, नवी सांगवी, दिघी या परिसरात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने शहरवासीयांना झोडपले. रात्री उशिरापर्यंत विजांचा कडकडाट सुरू होता.
किवळे परिसरात अवकाळी पावसाची हजेरी
किवळे : विकासनगर, किवळे, देहूरोड व परिसरात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वारा व गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसाने कामावरून येणारे कामगार, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची धांदल उडाली. पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठा खंडित झालेला असून सहापर्यंत सुरळीत झालेला नव्हता.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवामानात बदल झाल्याने तापमान वाढले होते. उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने तसेच विदर्भ व मराठवाडा भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पावसाची शक्यता गृहीत धरून किवळे शिवारातील काही शेतकऱ्यांनी कापणी केलेली गहू व ज्वारी पिकाची मळणी करण्यासाठी लगबग दिसून येत होती. काही शेतकऱ्यांनी पावसाची शक्यता असल्याने चारा भिजू नये म्हणून उपाययोजना करण्यात येत होती. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले. घरी जळणासाठी साठवून ठेवलेल्या गोवऱ्या भिजू नये याकरिता काही महिला धावपळ करताना दिसून आल्या.