कोयता भिरकावून दहशत माजवल्याप्रकरणी दुचाकीस्वार तरूणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 16:59 IST2021-07-01T16:59:07+5:302021-07-01T16:59:15+5:30
पिंपरीतील दिघी- भोसरी रोडला बुधवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला

कोयता भिरकावून दहशत माजवल्याप्रकरणी दुचाकीस्वार तरूणाला अटक
पिंपरी: दुचाकीस्वार तरुणाने हातात कोयता घेऊन तो भिरकावून आरडाओरडा करून दहशत माजवली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पिरॅमिड हॉटेल चौक, दिघी- भोसरी रोड, दिघी येथे बुधवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.
साहिल सनउल्ला शहा (वय २३, रा. गजानन महाराज नगर, दिघी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक हेमंत आव्हाड यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा दुचाकीवर बसून हातात लोखंडी कोयता घेऊन तो इकडे तिकडे भिरकावून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. कोणाला लय माज आलाय का, मी इथला दादा आहे, एकएकाला बघून घेतो, असे मोठ्याने ओरडून दहशत माजवली.
पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार लाठ्या-काठ्या, शस्त्र बाळगण्यास मनाई आहे. तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. आरोपीने त्या आदेशांचा भंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.