मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांच्या अंगावर घातली दुचाकी; तरूणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 19:34 IST2022-05-28T19:32:08+5:302022-05-28T19:34:10+5:30
पोलिसांशी झटपाट करणाऱ्या दुचाकीस्वाराला अटक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांच्या अंगावर घातली दुचाकी; तरूणाला अटक
पिंपरी : द्रुतगती मार्गावरून ट्रिपलसिट जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडविले असता त्याने पोलिसांच्या अंगावर दुचाकी घातली. तसेच त्यांच्याशी अरेरावी करून झटपट केली. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दुचाकीस्वाराला अटक केली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे शुक्रवारी (दि. २७) दुपारी पावणेएकच्या सुमारास ही घटना घडली.
नरेश हरीभाऊ भरणे (वय ४०, रा. येलघोल, ता. मावळ) असे अटक केलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू लुमाजी भालचिम (वय ५५) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून दुचाकीला प्रवेश बंदी आहे. तरीही नरेश भरणे हा या द्रुतगती मार्गावरून ट्रिपलसिट दुचाकी चालवत होता. त्यावेळी फिर्यादीने उर्से टोल नाका येथे नरेश भरणे याला थांबण्याचा इशारा केला. मात्र भरणे याने त्याकडे दुर्लक्ष करून फिर्यादीच्या अंगावर गेला. त्याला थांबवून कारवाईच्या अनुषंगाने पोलिसांनी विचारपूस केली. त्यावेळी भरणे याने पोलिसांशी अरेरावी करून उद्धटपणाचे वर्तन केले. शिवीगाळ करून फिर्यादीशी हुज्जत घालून झटापट केली. फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद आहे.