सांगवीत रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीचालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 21:39 IST2019-08-10T21:38:24+5:302019-08-10T21:39:52+5:30
गतिरोधकावर आदळून दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. यात दुचाकीचालक भगवान लाड याचा मृत्यू झाला.

सांगवीत रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीचालकाचा मृत्यू
पिंपरी : गतिरोधकावर आदळून दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. तसेच पाठीमागे बसलेल्या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सांगवी येथे रक्षक सोसायटीच्या समोर गुरुवारी (दि. ८) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान मुंजाजी लाड (वय २६, रा. विशालनगर, पिंपळे निलख, मूळ रा. माळसोना, पोस्ट धसाना, ता. जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. अमित सर्वोत्तमराव कनकदंडे (वय ३१, रा. वसमत रोड, दत्तधाम समोर, सत्कार कॉलनी, ता. जि. परभणी) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
भगवान लाड व अमित कनकदंडे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास पिंपळे निलख येथील रक्षक चौकातून रक्षक सोसायटी समोरून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी गतिरोधकावर आदळून दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. यात दुचाकीचालक भगवान लाड याचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला अमित कनकदंडे गंभीर जखमी झाला. या प्रकरणी कनकदंडे याने फिर्याद दिली आहे. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालक भगवान लाड याच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.