पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सतरा वर्षीय युवतीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवतीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. वाल्हेकरवाडी येथील कृष्णाई काॅलनी येथे रविवारी (दि. ११) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
कोमल भारत जाधव (१७, रा. कृष्णाई कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. युवतीचा मामा सचिन बिभीषण माने (३९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात संशयितांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी आदिती हिने फोन करून कळवले की, कोमल दिदीला दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन चाकूने हल्ला केला असून ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली आहे. त्यावरून फिर्यादी सचिन माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कोमलला आपल्या वाहनातून एका रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी कोमलला तातडीने वायसीएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, वायसीएम रुग्णालयात उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत कोमल ही कृष्णाई कॉलनी, चिंचवड येथे आपल्या आई व भावासोबत राहत होती. तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही वर्षांपासून तिची आई पतीपासून विभक्त राहत आहे.