बाणेर येथील कोविड सेंटरमधील मृतांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 21:58 IST2021-06-01T21:32:32+5:302021-06-01T21:58:18+5:30
कोविड सेंटरमधील मयतांच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी आरोपी काळेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

बाणेर येथील कोविड सेंटरमधील मृतांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक
पिंपरी : जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे रुग्ण तसेच मयतांच्या अंगावरील दागिने चोरीचे प्रकार समोर आले आहेत. अशा गुन्ह्यांतील दोन आरोपींना वाकडपोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ हजारांचा ऐवज हस्तगत केला.
शारदा अनिल आंबिलठगे (वय ३६), अनिल तुकाराम संगमे (वय ३५, दोघेही रा. रहाटणी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड सेंटरमधील रुग्ण व मयतांच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी आरोपी काळेवाडी परिसरात येणार आहेत, अशी माहिती पोलीस कर्मचारी वंदू गिरे आणि राजेंद्र काळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळेवाडी येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नऊ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
बाणेर येथील जम्बो कोविड सेंटरमधील उपचार घेणारे रुग्ण व मयताच्या अंगावरील दागिन्यांची चोरी केल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. तसेच या दागिने चोरीप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.