Video : सहज पैसे मिळावेत म्हणून 'सेटिंग' केली; कर्मचाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 12:23 IST2025-08-01T12:22:28+5:302025-08-01T12:23:44+5:30
- महापालिकेची विकासकामे झाल्यानंतर लेखा विभागाकडे संबंधित ठेकेदार बिले सादर करतात. बिले काढण्यासाठी लेखा व वित्त विभागामध्ये टक्केवारी ठरली असल्याचा आरोप होत आहे.

Video : सहज पैसे मिळावेत म्हणून 'सेटिंग' केली; कर्मचाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल
पिंपरी : महापालिकेच्या तळमजल्यावरील मुख्य लेखा व वित्त विभागाच्या कार्यालयात ठेकेदाराकडून पालिकेचा कर्मचारी पैसे घेताना व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. या प्रकरणानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी विभागात गुरुवार (दि.३१) पासून सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे विभागात काेणीही येऊ नये, सहज पैसे घेता यावेत, यासाठीच सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महापालिकेची विकासकामे झाल्यानंतर लेखा विभागाकडे संबंधित ठेकेदार बिले सादर करतात. बिले काढण्यासाठी लेखा व वित्त विभागामध्ये टक्केवारी ठरली असल्याचा आरोप होत आहे.
अधिकारी आणि संबंधित लिपिक, लेखा अधिकाऱ्याचा वाटा दिल्याशिवाय फाइलच पुढे जात नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सातत्याने हाेत असते. बुधवारी (दि.३०) लेखा व वित्त विभागात एक ठेकेदार फाइलसाठी पैसे देत असल्याचा आणि कर्मचारी पैसे स्वीकारत असल्याचा व्हिडीओ साेशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजाराे लाेकांनी पाहिला असून महापालिकेच्या कारभारावर नागरिक टीका करत आहेत.
लेखा व वित्त विभागात बिलासंदर्भात अनेक ठेकेदार येत असतात. त्यामुळे सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे. लेखा विभागातील कर्मचारी पैसे घेतानाचा साेशल मीडियावर व्हायरल हाेणाऱ्या व्हिडीओ संदर्भात काेणाचीही लेखी तक्रार अद्याप आली नाही. तक्रार आल्यास कारवाई केली जाईल.
- प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका.
लेखा विभागातील पैसे घेतानाचा व्हायरल हाेणारा व्हिडीओ आपण पाहिला नाही. व्हिडीओ पाहून याेग्य ती कारवाई केली जाईल.
- मनाेज लाेणकर, सहआयुक्त, सामान्य प्रशासन विभाग.