बलात्काराची तक्रार पोलिसात देण्याची धमकी देत तरुणाकडून उकळले लाखो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 15:32 IST2019-04-21T15:28:47+5:302019-04-21T15:32:06+5:30
सोशल मीडियावर ओळख निर्माण करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, समाजात बदनामी करेन अशी धमकी देत एका तरुणीने तरुणाकडून लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे.

बलात्काराची तक्रार पोलिसात देण्याची धमकी देत तरुणाकडून उकळले लाखो रुपये
पिंपरी : सोशल मीडियावर ओळख निर्माण करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, समाजात बदनामी करेन अशी धमकी देत एका तरुणीने तरुणाकडून लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तरुणी पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात राहते. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून फिर्यादी यांच्या पतीला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मला नोकरीची गरज आहे मला नोकरी मिळवून द्या असे म्हणून जवळीक साधली. पिडीत तरुणाकडे पैसे मागितले असता त्यांनी पैसे दिले. ते पैसे आरोपी तरुणीने परत केल्याने तिच्यावर पिडीत तरुणाचा विश्वास बसला. असे त्यांच्यात अनेकदा पैश्याचे व्यवहार झाले. त्यानंतर मात्र, बलात्कार केल्याची पोलिसात तक्रार देण्याची धमकी देत तरुणीने पिडीत तरुणाकडून वेळोवेळी तब्बल ४ लाख रुपये तसेच मोबाईल, सोनसाखळीसह वाढदिवसाला दुचाकी गिफ्ट म्हणून घेतली. दरम्यान, बलात्कार केल्याची ती धमकी देत असल्याने तरुण हतबल झाला होता. याबाबत पत्नीला सांगेल असे देखील ती म्हणत होती. त्यामुळे अखेर कंटाळून तरुणाने मोबाईल बंद ठेवला, तेव्हा फिर्यादी पत्नीच्या नंबरवर फोन आला आणि सर्व घटना समोर आली. पत्नीने सर्व हकीकत चिखली पोलीस ठाण्यात सांगितली.
त्यानंतर, आरोपी तरुणीला पोलिसांनी सापळा लावून तरुणीला अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक रत्ना सावंत करत आहेत.