मुळशी धरण परिसरातील कंपने भूकंपाची नाहीत, जीएसआय करणार सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 21:01 IST2022-07-19T20:59:33+5:302022-07-19T21:01:40+5:30
धरण परिसरात नोंद झालेली कंपने भूकंपाची नाहीत...

मुळशी धरण परिसरातील कंपने भूकंपाची नाहीत, जीएसआय करणार सर्वेक्षण
पुणे: मुळशी तालुक्यातील लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेला (जीएसआय) सर्वेक्षण करण्याबाबत कळवले आहे. दरम्यान मुळशी धरण परिसरात नोंद झालेली कंपने भूकंपाची नसून अतिशय कमी तीव्रतेची असल्याची माहिती टाटा पॉवरकडून देण्यात आली.
टाटा पॉवरने मुळशी धरण परिसरात भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाल्याबाबत प्रथमदर्शनी कळवले होते. तथापि, नोंद झालेली कंपने ही भूकंपाची नसून ४०-४२ किमी परिघामधील विस्फोट, भूस्खलन आदी स्वरुपाच्या आघातजनक घटनांमुळे झाले असल्याचा अंदाज आहे. नोंद झालेली कंपने अतिशय कमी तीव्रतेची (०.२ जी) असल्याचे दिसून आले, असे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले.
त्यामुळे लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी या जागेचे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे जीएसआयला कळवले आहे.