पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव

By विश्वास मोरे | Updated: April 23, 2025 19:54 IST2025-04-23T19:53:10+5:302025-04-23T19:54:54+5:30

पहलगामच्या या भागात एकही सुरक्षा दलाचा एकही जण पाहायला मिळाला नाही, फक्त मुख्य रस्त्यावर सुरक्षादलाचे सैनिक होते

The road to Baisaran Valley in Pahalgam is difficult and complicated, there is no security guard, the experience of a tourist from Akurdi | पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव

पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव

पिंपरी : मी आणि पत्नी १५ एप्रिलला काश्मीर फिरण्यासाठी आलो आहे. लेह लडाखला जाताना रस्त्यात पेहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, असे कळताच पुढचे फिरण्याचे नियोजन रद्द केले आहे. आम्ही परत श्रीनगरला आलो. पेहलगाम बैसरण घाटी पर्यटनस्थळ असतानाही येथे एकही सुरक्षारक्षक दिसून आला नाही, हा रस्ता खूप बिकट आणि किचकट असल्यामुळे दहशतवाद्यांनी हे ठिकाण निवडले असावे, असे सांगत होते आकुर्डीतील नागरिक बशीर सुतार. 

बैसरण घाटी येथे एक दिवस अगोदरच बशीर सुतार कुटुंब गेले होते. सुतार म्हणाले, 'काल पहलगाममध्ये हल्ला झाला आहे, असे कळाले. त्यामुळे रात्रीच श्रीनगरला आलो. जिथे हल्ला झाला त्या ठिकाणी एक दिवस आधीच फिरून आलो होतो. त्याठिकाणी रस्ता खूप अरुंद आहे. तिथे घोड्याशिवाय जाता येत नाही. कमीत कमी एक ते दीड तास लागतो. या ठिकाणास मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. येथे बजरंगी भाईजानमधील मुन्नीचजे घर दाखवले आहे, ते येथे आहे. त्यामुळे इथे पर्यटक येत असतात. परंतु, येथे एकही सुरक्षा दलाचा एकही जण पाहायला मिळाला नाही. फक्त मुख्य रस्त्यावर सुरक्षादलाचे सैनिक होते. घाटीचा हा रस्ता खूप बिकट आणि किचकट असल्यामुळे दहशतवाद्यांनी हे ठिकाण निवडले असावे. आम्ही उर्वरित कार्यक्रम रद्द केला आहे. आमचे दिनांक २८ एप्रिलला श्रीनगर ते मुंबई तिकीट होतं, ते रद्द करून २४ एप्रिलचे तिकीट पुन्हा आरक्षित केलं आहे.

 दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये रोजगार ठप्प झाला आहे. घोड्यावाले, हॉटेल, रस्त्यावर छोटी-छोटी दुकाने आहेत. बोटीमध्येमध्ये फिरवणारे जे लोक असतात, आता त्यांचाही रोजगार गेला आहे. आज श्रीनगरला रस्त्यावर एकही गाडी दिसली नाही. पर्यटकांची गर्दी असणारे शहरात भकास वातावरण दिसून आले. सर्व काही ठप्प झाले आहे. यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलली पाहिजेत. वातावरण पूर्ववत व्हायला हवे.
 आज जेव्हा देशाचे गृहमंत्री या ठिकाणी आले तेव्हा त्यांच्यासाठी सर्व सुरक्षा दले तिथे हजर होती. मात्र, काल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काहीच व्यवस्था नव्हती, याचे खूप दुःख वाटते. पर्यटकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? घडलेली घटना दुर्दैवी आहे.'

Web Title: The road to Baisaran Valley in Pahalgam is difficult and complicated, there is no security guard, the experience of a tourist from Akurdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.