टपाल खात्याची नवीन ‘ॲडव्हान्स्ड सेवा’ कोलमडली;राख्या पाठविण्यासाठी आलेल्या महिलांची निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:57 IST2025-08-06T14:56:40+5:302025-08-06T14:57:43+5:30
- महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कारण ९ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने अनेक महिला भावाकडे राख्यांचे पार्सल पाठविण्यासाठी शहरातील विविध टपाल कार्यालयांत आल्या होत्या. मात्र,,

टपाल खात्याची नवीन ‘ॲडव्हान्स्ड सेवा’ कोलमडली;राख्या पाठविण्यासाठी आलेल्या महिलांची निराशा
पिंपरी : भारतीय टपाल खात्याने पोस्ट सेवा गतिमान आणि कार्यक्षम बनविण्यासाठी सोमवार (दि. ४) पासून ‘ॲडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजी २.०’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. या नव्या प्रणालीमुळे टपाल सेवा अधिक गतिमान होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात दुसऱ्याच दिवशी (दि. ५) या नव्या प्रणालीचा बोजवारा उडाल्याचे चित्र पिंपरी-चिंचवड शहरातील विविध टपाल कार्यालयांत दिसून आले.
टपाल खात्याचा कारभार गतिमान तसेच कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी सोमवारपासून या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवशी या तंत्रज्ञानाचा वापर करताना अनेक अडचणींचा सामना टपाल कर्मचाऱ्यांना करावा लागला.
सोमवारी हे कामकाज अतिशय संथगतीने सुरू होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती कायम असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ग्राहकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. नवीन तंत्रज्ञान समजून घेताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे पाहायला मिळाले.
महिलांना मोठा मनस्ताप
यामध्ये महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कारण ९ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने अनेक महिला भावाकडे राख्यांचे पार्सल पाठविण्यासाठी शहरातील विविध टपाल कार्यालयांत आल्या होत्या. मात्र, यंत्रणा संथगतीने सुरू असल्याने त्यांना ताटकळत थांबावे लागले. काही महिलांनी राख्या टपाल कर्मचाऱ्यांकडे सोपविल्या. मात्र, त्या पाठविल्या की नाहीत, याची खात्री करण्यासाठी त्यांना पुन्हा-पुन्हा हेलपाटे मारावे लागले.
अन्य ग्राहकांचीही गैरसोय
स्पीड पोस्ट, रजिस्टर, पार्सल बुकिंग, तसेच फॉरेन बुकिंग यांसारख्या प्रमुख सेवा नव्या प्रणालीमुळे बाधित झाल्या. कामकाज अत्यंत संथगतीने सुरू असल्याने टपाल कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली होती. अनेक ग्राहक ताटकळत उभे राहिले होते. काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
टपाल कार्यालयांमध्ये सोमवारपासून नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. हे तंत्रज्ञान समजून घेताना काही प्रमाणात अडचणी येत आहेत. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले रजिस्टर, स्पीड पोस्ट व पार्सल काउंटर बंद झाल्यानंतर बुक करण्यात आले. एक ते दोन दिवसांत कामकाज गतिमान होईल. - काळूराम पारखी, जनसंपर्क अधिकारी, पिंपरी पीएफ डाकघर
मी मंत्रालयातील पत्रव्यवहाराचे पाकीट स्पीड पोस्टाद्वारे पाठविण्यासाठी चिंचवड स्टेशन येथील टपाल कार्यालयात मंगळवारी सकाळी १० वाजता गेलो होतो. तेथे मोठी रांग दिसली. कामकाज संथगतीने सुुरू असल्याचे समजले. त्यामुळे माघारी फिरावे लागले. -मिलिंद सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते, चिंचवड स्टेशन
भावाला राखी पाठविण्यासाठी संभाजीनगरच्या शिवाजी पार्क येथील टपाल कार्यालयात गेले असता पार्सल सेवा बंद असल्याची माहिती मिळाली. वेळेत राखी पोहोचणे गरजेचे असल्याने कुरिअर सेवेचा आधार घेतला. - करुणा रोकडे, गृहिणी, पूर्णानगर