श्रीमंत पालिकेचा लौकिक इतिहासजमा; ५६० कोटींचे कर्ज, २०० कोटींचे कर्जरोखे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 14:23 IST2025-10-26T14:19:42+5:302025-10-26T14:23:34+5:30
- जनसंवाद कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते कर्जाच्या चौकशीचे आदेश, लेखा विभागाची कर्ज घेतल्याची कबुली; नाशिक फाटा पुलासाठी १५९ कोटी ९१ लाखांचे कर्ज

श्रीमंत पालिकेचा लौकिक इतिहासजमा; ५६० कोटींचे कर्ज, २०० कोटींचे कर्जरोखे
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेवर हजारो कोटींचे कर्ज असल्याचा आरोप होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनसंवाद कार्यक्रमात या कर्जाची चौकशी करण्याचे संकेत दिले होते. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेने आतापर्यंत फक्त ५५९ कोटी ९१ लाख रुपयांचेच कर्ज घेतले आहे, असा खुलासा मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी केला आहे.
शहरातील एका लोकप्रतिनिधीने महापालिकेवर असलेल्या कर्जाची माहिती मागविल्यानंतर जैन यांनी त्यास उत्तर देताना सविस्तर आकडेवारी दिली. त्यानुसार, कासारवाडीतील नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपुलासाठी १५९ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले असून, त्यापैकी ९१ कोटी ९० लाख रुपयांची परतफेड झाली आहे. मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांचे म्युनिसिपल बॉण्डद्वारे कर्ज घेतले होते, त्यातील ९० कोटींची परतफेड करण्यात आली आहे.
याशिवाय हरित सेतू आणि टेल्को रस्त्यावरील सुशोभीकरणासाठी ग्रीन बॉण्डद्वारे २०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले असून, त्यातील १३ कोटी ५० लाख रुपयांची परतफेड झाल्याची माहिती देण्यात आली. या तीन प्रकल्पांनुसार एकूण ५५९ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले असून, त्यापैकी ३६४ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज फेडणे बाकी असल्याचे लेखा व वित्त विभागाने नमूद केले आहे.
शासनाच्या परवानगीने आणि नियमानुसारच कर्ज
महापालिकेने घेतलेले सर्व कर्ज केंद्र व राज्य शासनाच्या परवानगीने आणि नियमानुसारच काढण्यात आले आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जात असून, परतफेडीबाबत कोणताही विलंब नाही, असेही जैन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, क्रिसील आणि केअर या देशातील प्रतिष्ठित पतमानांकन संस्थांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘एए स्टेबल’ असे क्रेडिट रेटिंग दिले आहे. हे रेटिंग महापालिकेची आर्थिक स्थिती सुदृढ आणि विश्वासार्ह असल्याचे द्योतक मानले जाते.
महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असून, सर्व कर्जांची परतफेड नियमितपणे केली जात आहे. आतापर्यंत ५६० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यापैकी आतापर्यंत एकूण ३६४ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज फेडणे बाकी आहे. - प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका