Chinchwad By Election: चिंचवडमध्ये १२ ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 16:51 IST2023-02-26T16:51:09+5:302023-02-26T16:51:18+5:30
अभियंत्यांनी तात्काळ या मशिन दुरूस्त केल्या

Chinchwad By Election: चिंचवडमध्ये १२ ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड
पिंपरी : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघामध्ये ५१० केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. यावेळी विविध ठिकाणच्या केंद्रांवर १२ ईव्हीएम मशिन बंद पडल्या. मात्र, शीघ्र कृती दलाने तात्काळ धाव घेत दुरुस्ती केल्याने मतदान प्रक्रिया सुरळित सुरू राहिली.
चिंचवड पोटनिनडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याची तक्रार कक्षाकडे आली होती. त्यानुसार शीघ्र कृती दलाने तात्काळ धाव घेत तेथील यंत्रांची दुरूस्ती केली. ईव्हीएममध्ये बहुतांश वेळा बॅटरी संपण्याचे किंवा वीजपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे ईव्हीएममध्ये व्यत्यय येतो. त्यामुळे मतदान प्रक्रिया बंद होते. अशावेळी शीघ्र कृती दलाकडून त्याची तात्काळ दुरुस्ती केली जाते. शीघ्र कृती दलामध्ये ईव्हीएम दुरुस्ती करण्यासाठी अभियंते असतात. तसेच निवडणूक विभागाचे कर्मचारी असतात. त्यांच्यासोबत नवीन बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट उपलब्ध असतात. अभियंत्यांच्या माध्यमातून तात्काळ यंत्रांची दुरुस्ती केली जाते. मतदान सुरू असताना काही विविध केंद्रांवर १२ यंत्र बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यावर निवडणूक विभागाने तात्काळ कार्यवाही केली. त्यामुळे कोणत्याही केंद्रावर निवडणूक प्रक्रिया बंद न पडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
१२ यंत्रे बंद पडण्याची सूचना विभागाला प्राप्त झाली होती. त्यावर शीघ्र कृती दलाने तात्काळ कारवाई केली. काही मशिनमध्ये बॅटऱ्यांची अडचण आली होती. तर काहींमध्ये कनेक्शनची अडचण होती. अभियंत्यांनी तात्काळ या मशिन दुरूस्त केल्या. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळित सुरू झाली. - किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी.