Suicide by newlyweds in bride at Talegaon Dabhade | दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या ; कारण अज्ञात 

दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची आत्महत्या ; कारण अज्ञात 

तळेगाव दाभाडे : नवविवाहितेने दरवाजा बंद करून मैत्रिणीच्या घरी छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वराळे (ता. मावळ) येथील भीमाशंकर कॉलनी येथे शनिवारी (दि.२८) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

संजना दीपक लोखंडे (वय १९, रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे ता. मावळ असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. महादेव गायकवाड यांच्याशी १० दिवसांपूर्वी संजनाचा विवाह झाला होता. आत्महत्तेचे नेमके कारण समजू शकले नाही.

संजना हिचा  मामेभाऊ अक्षय रणपिसे यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यावर संजना कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली होती. ती तिच्या मैत्रिणीच्या घरी राहिली होती. घरचे तिचा शोध घेत होते. शनिवारी दुपारी तिने मैत्रिणीच्या घरी छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घराचा दरवाजा बंद असल्याने तोडण्यात आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रवीण कानडे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी तपास करीत आहेत.

Web Title: Suicide by newlyweds in bride at Talegaon Dabhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.