मनुष्यबळाअभावी दमछाक; पण गंभीर गुन्हे आणले नियंत्रणात : पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 13:00 IST2020-08-15T12:58:03+5:302020-08-15T13:00:23+5:30
लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी, गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या

मनुष्यबळाअभावी दमछाक; पण गंभीर गुन्हे आणले नियंत्रणात : पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई
नारायण बडगुजर-
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोनाच्या संकटाने कमी मनुष्यबळामुळे थोडीफार दमछाक झाली. असे असतानाही लाँकडाऊनची कडक अंमलबजावणी करुन संसर्ग रोखण्यासाठी पोलीस दलाने प्रयत्न केले. आयुक्तालयाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याशी साधलेला संवाद.
कम्युनिटी पोलिसिंगवर आपला भर होता. त्याविषयी काय सांगाल?
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राज्यातील तसेच परराज्यातील कामगार, मजूर, नोकरदार वर्ग, विद्यार्थी यांच्यासह उच्चभ्रू वसाहती आहेत. त्यामुळे या सर्वांचे राहणीमान, गरजा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे कम्युनिटी पोलिसिंगचा निर्णय घेतला होता. पोलीस काका, पोलीस दीदी, बडीकॉप त्याचाच एक भाग आहे. सुरुवातीच्या काळात त्यामुळे नागरिकांना मदत उपलब्ध झाली. मात्र कोरोना महामारीमुळे असे पोलिसिंग थांबले. लॉकडाऊनमध्ये विशेष पथके रद्द करून बंदोबस्तावर भर दिला.
लॉकडाऊनमध्ये पोलिसांवर अतिरिक्त ताण आहे?
आयुक्तालय नवीन असल्याने मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे त्यांना एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करावे लागते. नियमित काम जास्त असतानाही पोलिसांनी चोख बंदोबस्त केला. मात्र, त्याचा पोलिसांवर अतिरिक्त ताण पडणार नाही, याची काळजी घेतली. तसेच बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, होमगार्ड उपलब्ध झाल्या.
पोलिसांना संसर्ग होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या?
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पोलीस आणि नागरिक यांच्या थेट संपर्काचे प्रमाण वाढले. त्यामुळे पोलिसांना कोरोनाची लागण झाली. मात्र, खबरदारीच्या सूचना दिल्या. आरोपीला ताब्यात घेताना तसेच इतर कारवाई दरम्यान सुरक्षा साधनांचा वापर केला. ५५ वर्षांवरील वयाच्या पोलिसांना कामातून सवलत दिली.