पिंपरी : भोसरी येथील स्वरूपकुमार बिरंगळ या तरुणाने सीए परीक्षा पास होत यश मिळवले. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या स्वरूपकुमारने आईच्या मदतीने हे यश मिळवले. पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २२व्या वर्षी सीए झाल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्वरूपकुमार हा अहिल्यानगरमधील जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील आहे. नोकरी व्यवसायानिमित्त त्याचे कुटुंब शहरातील भोसरीमध्ये स्थायिक झाले. स्वरूपकुमार नऊ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याची आई मीना आखाडे यांनी मोठ्या हिमतीने त्याचा सांभाळ करत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्या स्वत: शिक्षिका आहेत. पतीच्या निधनानंतर कोणाचाही आधार नसल्याने त्यांनी पहिली ते दहावीचे वर्ग घेत स्वरूपकुमारचे शिक्षण पूर्ण केले. त्यासोबतच चांगले संस्कार देत मुलाला घडवले.
स्वरूपकुमारची जिद्द, चिकाटी आणि त्यासोबतच आईचे मार्गदर्शन यामुळे त्याने पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षेत चांगले यश मिळवले. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याने कुठेही महागडे क्लास लावत अभ्यास केला नाही. तर घरीच ऑनलाइन अभ्यास केला. समाजमाध्यमावर असलेल्या विविध शिक्षणाच्या चॅनलचा आधार घेत अभ्यास केला. त्यात त्याला चांगले यश मिळाले असून, शहरातून त्याचे कौतुक होत आहे.
स्वरूपकुमार हा लहानपणापासून अतिशय हुशार आहे. दहावीपर्यंत त्याचा वर्गात नेहमीच पहिला क्रमांक येत होता. सीए होण्याची त्याची इच्छा होती. त्यामध्ये त्याने चांगले यश मिळवल्याचे समाधान आहे. -मीना बिरंगळ, आई