Crime News| आत्महत्येची धमकी दिल्याप्रकरणी एसटीच्या बडतर्फ लिपिकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 13:35 IST2022-02-23T13:31:12+5:302022-02-23T13:35:03+5:30
१९ फेब्रुवारीला सकाळी साडेसहा ते अकरा या कालावधीत ही घटना घडली...

Crime News| आत्महत्येची धमकी दिल्याप्रकरणी एसटीच्या बडतर्फ लिपिकाला अटक
पिंपरी : मला विनाकारण बडतर्फ करण्यात आले आहे, असे म्हणून बडतर्फ लिपिकाने आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच रस्त्यावर आडवे झोपून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी लिपिकाला अटक करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) दापोडी येथील विभागीय कार्यशाळा येथे १९ फेब्रुवारीला सकाळी साडेसहा ते अकरा या कालावधीत ही घटना घडली.
विनोद भोजू राठोड (वय ३०, रा. एसटी काॅलनी, स्वारगेट), असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे. अशोक सोपानराव सोट (वय ५६, रा. वाघोली) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. २२) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाचे यंत्र अभियंता आहेत. तसेच आरोपी विनोद राठोड हा एसटीमध्ये लिपिक होता. त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. आरोपी राठोड हा शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी एसटीच्या दापोडी येथील विभागीय कार्यशाळेच्या गेटवर आले. मला विनाकारण बडतर्फ करण्यात आलेले आहे. मी तुमची नावे लिहून तुमच्या नावाने आत्महत्या करील, अशी धमकी आरोपीने दिली. तसेच विभागीय कार्यशाळेच्या मुख्य गेटसमोर रस्त्यावर आडवे झोपून राहिला.
आरोपीने फिर्यादी व फिर्यादीसोबतच्या अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करून तुमची नोकरी घालवतो, अशी धमकी दिली. विभागीय कार्यशाळेच्या मुख्य गेटसमोर रस्त्यावर आडवे झोपून आरोपीने शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले तपास करीत आहेत.