Pimpri Chinchwad | घरगुती वादातून जावयाने घेतला सासऱ्याचा चावा; वाकडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 18:54 IST2023-04-03T18:52:31+5:302023-04-03T18:54:27+5:30
भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सासऱ्याच्या हाताला जावयाचा दोनदा चावा...

Pimpri Chinchwad | घरगुती वादातून जावयाने घेतला सासऱ्याचा चावा; वाकडमधील घटना
पिंपरी : घरगुती वादातून पतीच्या घरामधील सामान आणण्यासाठी पत्नी गेली. मात्र, पतीने तिला मारहाण केली, तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तिच्या वडिलांच्या हाताला दोनदा चावा घेतला. ही घटना शुक्रवारी (दि. ३१) वाकड येथे घडली. या प्रकरणी अजय बाबूलाल शहा (वय ६६, रा.सांगली) यांनी वाकडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, जावई गौरव अजित शहा (वय ३२, रा.वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी तिच्या लहान मुलीसह सामान व कपडे आणण्यासाठी ती राहत असलेल्या पतीच्या घरी गेली होती. तिने आरोपी पतीला मी आता थोडे सामान घेऊन जाते. परत बाकीचे सामान नेते, असे सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीने चिडून पत्नीला मारहाण केली, तसेच आपल्या लहान मुलीलाही मारले. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी हे गेले असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्या उजव्या हाताला दोनदा चावा घेत जखमी केले.