मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने पिंपरी- चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्त्याला ठेवले नजरकैदेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 17:40 IST2019-01-09T17:37:54+5:302019-01-09T17:40:16+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी आंदोलनापुर्वीच ताब्यात घेत दिवसभर नजरकैदत ठेवले.

मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने पिंपरी- चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्त्याला ठेवले नजरकैदेत
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी आंदोलनापुर्वीच ताब्यात घेत दिवसभर नजरकैदेत ठेवले. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता चिंचवड येथील प्रा.कै. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे उदघाटन तसेच सभेचे आयोजन केले होते. या प्रेक्षागृहासमोरच धरणे आंदोलन करणार होते. मात्र, त्यापुर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
अनियमित बांधकामे (घरे) नियमित करण्याबाबत शासन निर्णयात जनतेच्या बाजूने सकारात्मक बदल करून नवीन नियमावली व्हावी, संपूर्ण शास्तीकर रद्द करणे, पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारी बंद नळाची योजना समन्वयाने मार्गी लावावी, पिंपरी चिचवड शहरातील ७२ झोपडपट्ट्यांबाबत निर्णय घ्यावा, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासह मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणाबाबत सरकारने दिलेला शब्द पाळावा व तिन्ही समजाबाबतच्या आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, रिंग रोडबाबत जनतेच्या बाजूने सकारात्मक निर्णय घ्यावा, आदी मागण्या भापकर यांनी केल्या आहेत.
याबाबत भापकर म्हणाले की, शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात आज आंदोलन करणार होतो. मात्र, सकाळीच पोलीस घरी दाखल झाले. मला ताब्यात घेवून पिंपरी पोलीस ठाण्यात नेले. तसेच दिवसभर नजरकैदेत ठेवले.