आयटीपार्कमध्ये विक्रीसाठी आणलेला सहा लाख 40 हजारांचा गांजा जप्त; तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 13:13 IST2020-09-24T13:12:37+5:302020-09-24T13:13:26+5:30
पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

आयटीपार्कमध्ये विक्रीसाठी आणलेला सहा लाख 40 हजारांचा गांजा जप्त; तरुणाला अटक
पिंपरी : हिंजवडी आयटीपार्क फेज दोन येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून पोलिसांनी सहा लाख 40 हजार 150 रुपयांचा 25 किलो 606 ग्रॅम गांजा जप्त केला. पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
योगेश्वर गजानन फाटे (वय 23, रा. जनवाडी, जनता वसाहत, गोखलेनगर पूणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी गांजा विक्री करण्यासाठी हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क फेज दोन, बोडकेवाडी येथे एका कंपनीच्या संरक्षक भितीजवळ येणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस फौजदार शाकिर जिनेडी यांना मिळाली. त्यावरून अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावून योगेश्वर फाटे याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पोत्यासारख्या पिशवीची झडती घेतली असता त्यात सहा लाख 40 हजार 150 रुपयांचा 25 किलो 606 ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याची आरोपीने कबुली दिली.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, सहाय्यक पोलीस फौजदार शाकीर जिनेडी, पोलीस कर्मचारी राजन महाडीक, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, शकुर तांबोळी, संदीप पाटील, सतीष दिघे, संतोष भालेराव, अशोक गारगोटे, दादा धस, प्रसाद जंगीलवाड, अजित कुटे, पांडूरंग फुंदे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली.