वहिनी आमदार अन् दीर शहराध्यक्ष; दोन्ही पद एकाच घरात, काही पदाधिकारी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 02:57 PM2023-07-20T14:57:00+5:302023-07-20T14:58:07+5:30

काही भाजपच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितले

Sister-in-law MLA and Dir City President; Both positions are in the same house, some officials are upset | वहिनी आमदार अन् दीर शहराध्यक्ष; दोन्ही पद एकाच घरात, काही पदाधिकारी नाराज

वहिनी आमदार अन् दीर शहराध्यक्ष; दोन्ही पद एकाच घरात, काही पदाधिकारी नाराज

googlenewsNext

पिंपरी : भाजप शहराध्यक्ष पदावरून एक महिन्यापूर्वी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी सूचक विधान केले होते. आमदार वहिनी बोलल्या आणि शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची बुधवारी निवड जाहीर झाली. त्यावरून भाजपातील काही नेते आणि नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. भाजपने खांदेपालट करताना चिंचवड मतदारसंघाचे आमदार पदानंतर शहराध्यक्षपद एकाच परिवारात दिल्याबद्दल काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या शहराध्यक्षपदाचा कालखंड सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाला. त्यामुळे लांडगे यांना संधी देणार की नवीन अध्यक्ष नियुक्त करणार, याविषयी सहा महिने खलबते सुरू होती. या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात चिंचवड येथील पत्रकार परिषदेत आमदार अश्विनी जगताप यांना शहराध्यक्ष पदाबाबत बदल होणार का? असे पत्रकारांनी विचारले. त्यावर ‘बदल तर अपेक्षितच’ असे सूचक विधान जगताप यांनी केले होते.

दरम्यानच्या कालखंडात या पदासाठी शंकर जगताप, सदाशिव खाडे, एकनाथ पवार, शत्रुघ्न काटे, राहुल जाधव, अमित गोरखे, चंद्रकांत नखाते, मोरेश्वर शेडगे यांच्या नावाची चर्चा होती. पक्षसंघटना आणि कार्यकर्ते माहीत असणाऱ्या नेतृत्वास संधी द्यावी, अशी मागणी भाजपातील आजी माजी नगरसेवकांनी व्यक्त केली होती. बुधवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या. त्यात भाजपने शहराध्यक्षपदाची धुरा शंकर जगताप यांच्याकडे सोपविली. त्यानंतर पक्षातील काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी लेटरवॉर सुरू केले आहे.

एकाच परिवारात दोन पदे...

भाजपकडून जगताप कुटुंबाला झुकतं माप दिले जात आहे. एकाच परिवारात आमदार व शहराध्यक्षपद दिल्याने भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. तसेच, काही भाजपच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे.

सर्वांना बरोबर घेऊन काम करणार

आमदार महेश लांडगे आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहर पातळीवरील पक्षात परिवार म्हणून जी परंपरा कायम ठेवली, तोच पायंडा कायम ठेवणार आहे. काही नाराजी असेल तर ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्वांशी चर्चा करून आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. -शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजप

Web Title: Sister-in-law MLA and Dir City President; Both positions are in the same house, some officials are upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.