एमआयडीसीत कामगारांचा तुटवडा;शहरात ठेकेदार-उद्योजक अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:03 IST2026-04-07T15:03:28+5:302026-04-07T15:03:52+5:30

- आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली गॅस टंचाई, लॉकडाऊनची अफवा आणि दरवाढीचा परिणाम; उत्पादनावर परिणाम; परप्रांतीय, राज्यातील कंत्राटी कामगारांनी धरली मूळ गावाची वाट

Shortage of workers in MIDC; Contractors and entrepreneurs in the city are in trouble | एमआयडीसीत कामगारांचा तुटवडा;शहरात ठेकेदार-उद्योजक अडचणीत

एमआयडीसीत कामगारांचा तुटवडा;शहरात ठेकेदार-उद्योजक अडचणीत

पिंपरी :पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरात सध्या कामगारांची टंचाई तीव्र झाली असून, त्याचा मोठा फटका लघू, सूक्ष्म व मध्यम उद्योगांसह मोठ्या कंपन्यांनाही बसत आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली गॅस टंचाई, काही दिवसांपूर्वी पसरलेली लॉकडाऊनची अफवा आणि हॉटेलांमधील दरवाढीमुळे परप्रांतीय तसेच राज्यातील कंत्राटी कामगारांनी मूळगावाची वाट धरली आहे.

पिंपरी चिंचवड आणि चाकण एमआयडीसी परिसरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांसह लघू, सूक्ष्म व मध्यम उद्योगांमध्ये लाखो कामगार कार्यरत आहेत. मात्र, गॅस टंचाईमुळे औद्योगिक तसेच व्यावसायिक व्यवहार विस्कळीत झाले आहेत. व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत नसल्याने हॉटेल आणि खानावळींमधील जेवण-नाश्त्याचे दर वाढले आहेत. याचा थेट परिणाम कामगारांच्या खर्चावर होत असून, अनेकांनी गावाकडे परत जाणे पसंत केले आहे.

कामगारांच्या घटत्या संख्येमुळे कंपन्यांना मनुष्यबळ पुरविणारे ठेकेदार अडचणीत आले आहेत. अनेक ठिकाणी कामगार अचानक निघून गेल्याने नियोजित उत्पादनावर परिणाम होत आहे. नवीन कामगार मिळविण्यासाठी ठेकेदारांना मोठी कसरत करावी लागत असून, वाढीव वेतन व इतर सुविधा देऊनही प्रतिसाद मर्यादित मिळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, लघुउद्योजकांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कमी मनुष्यबळावर उत्पादन सुरू ठेवताना वेळेत ऑर्डर पूर्ण करणे कठीण होत आहे. काही उद्योगांना ऑर्डर रद्द करावी लागत असून, आर्थिक तोट्याची भीती व्यक्त केली जात आहे. औद्योगिक क्षेत्रातील कामकाज विस्कळीत होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

माझ्याकडे २५ कामगार काम करीत होते. सध्या फक्त २५ कामगार उरले आहेत. परिणामी उत्पादन क्षमता घटली आहे. ठेकेदारांकडूनही पुरेसा मनुष्यबळ मिळत नाही. परिस्थिती अशीच राहिल्यास उद्योग चालविणे कठीण होईल. -संजय सातव, लघुउद्योजक, भोसरी 

 

दरवर्षी होळीला परप्रांतीय कामगार गावी जातात. गेल्या वर्षी होळी आणि कुंभमेळा, तर यंदा होळीसह गॅस टंचाईमुळे कामगारांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातही गॅस टंचाई आणि लॉकडाऊनच्या अफवेने अनेक कामगार गावी गेले. -प्रशांत गोडगे पाटील, कंत्राटी कामगार पुरवठादार. 

सध्या जेवण बनवण्यासाठी गॅस मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. गॅस मिळाला नाही तर आम्हाला पुणे सोडून गावी जावे लागेल - राज यादव, परप्रांतीय कामगार, तळवडे.
 

महिनाभरापासून स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा तुटवडा आहे. आमच्याकडे अधिकृत गॅस जोडणी नसल्याने काळ्या बाजारातून पाच किलोचा गॅस दीड हजार ते दोन हजार रुपयांना खरेदी करावा लागत आहे. त्यासाठीही धावपळ करावी लागते - एक परप्रांतीय कामगार, चिखली.

Web Title : एमआईडीसी में श्रमिकों की कमी; ठेकेदार, व्यवसाय संकट में।

Web Summary : पिंपरी-चिंचवड एमआईडीसी गैस की कमी, लॉकडाउन की अफवाहों और बढ़ते भोजन खर्च के कारण गंभीर श्रम संकट का सामना कर रहा है। कंपनियां उत्पादन के साथ संघर्ष कर रही हैं, और ठेकेदार श्रमिकों को खोजने के लिए संघर्ष कर रहे हैं। छोटे व्यवसायों को बाधित संचालन के बीच वित्तीय नुकसान का डर है।

Web Title : Labor shortage hits MIDC; contractors, businesses face difficulties.

Web Summary : Pimpri-Chinchwad MIDC faces severe labor shortages due to gas scarcity, lockdown rumors, and rising food costs. Companies struggle with production, and contractors struggle to find workers. Small businesses fear financial losses amid disrupted operations.