धक्कादायक ! पत्नीच्या यातना सहन न झाल्याने तिचा खून करुन पतीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 14:51 IST2019-08-28T14:44:40+5:302019-08-28T14:51:34+5:30
पत्नीला तिच्या आजारपणामुळे हाेणाऱ्या यातना न बघवल्याने पतीने पत्नीचा खून करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रावेत येथे घडली आहे.

धक्कादायक ! पत्नीच्या यातना सहन न झाल्याने तिचा खून करुन पतीची आत्महत्या
पिंपरी : आजारी असलेल्या पत्नीचा खून करून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. रावेत येथील शिंदे वस्तीत बुधवारी (दि. २८) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वृशाली लाटे (वय ४०) व संजय लाटे (वय ४५, दोघे. रा. शिंदेवस्ती, रावेत) अशी मयत पती-पत्नीचे नाव आहे. वृशाली गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आजारपणामुळे त्यांना यातना होत असत. त्या यातना सहन न झाल्याने पती संजय यांनी वृशाली यांच्या डोक्यात हातोडी मारून त्यांचा खून केला. त्यानंतर स्वत: गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांनी पत्नीच्या आजारपणामुळे यातना सहन झाल्याने हा प्रकार करीत असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, संजय यांची बहीण त्यांच्याकडे आली आहे. मंगळवारी (दि. २७) रात्री संजय यांनी त्यांच्या बहिणीला पत्नीच्या आजारपणाबाबत सांगितले. त्याबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच बुधवारी (दि. २८) पहाटे चारच्या सुमारास संजय यांनी त्यांच्या रावेत येथे राहात असलेल्या भावाला मोबाइलवरून मेसेज केला. या सर्व बाबींना मी कंटाळलो आहे, त्यामुळे जीवन संपवत आहे, अशा आशयाचा मजकूर असलेला मेसेज संजय यांनी केला असल्याचे सांगण्यात येत आहे. मयत लाटे दाम्पत्य शिंदेवस्ती येथील एका हाऊसिंग सोसायटीत सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वास्तव्यास होते. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.