पिंपरीत शिवसैनिक-भाजपा कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 20:20 IST2022-06-23T20:16:49+5:302022-06-23T20:20:17+5:30
दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने...

पिंपरीत शिवसैनिक-भाजपा कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला
पिंपरी : राज्यातील राजकीय भूकंपाचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये देखील उमटले. पिंपरी येथे गुरुवारी (दि. २३) सायंकाळी शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. ‘गद्दार आमदारांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. देवेंद्र फडणवीस तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणा भाजपाकडून करण्यात आली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.
शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटी येथे गेल्याने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकार डळमळीत झाल्याचे सध्या चित्र आहे. गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांचा निषेध करण्यासाठी शहरातील शिवसैनिकांकडून पिंपरी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या उमा खापरे यांचे स्वागत करून शहर भाजपाकडून रॅली काढण्यात आली. पिंपरी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारक येथे ही रॅली आली. त्यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि शिवसैनिक एकमेकांच्या समोर उभे ठाकले. तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची शक्यता असल्याचे पाहून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर भाजपाची रॅली मार्गस्थ झाली.
जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकणी गुन्हा दाखल
उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक पिंपरी चौकात एकत्र आले. त्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेतली नाही. यातून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पूर्वपरवानगी न घेता जमाव केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली.