ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : ‘ती’ दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेली. घरची परिस्थिती हलाखीची. वडिलांचा छोटासा व्यवसाय असल्याने पुढे शिक्षण घेण्यापेक्षा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी मिळविणे तिचे ध्येय होते. तिला चाकणमधील कंपनीत शिक्षणासोबतच ॲप्रेंटिस करण्याची संधी मिळाली. दरम्यान, वडिलांचे आकस्मिक निधन झाले. घरात तीच थोरली असल्याने कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. बहीण आणि आईचा सांभाळ, त्यातच नोकरी आणि शिक्षण अशी तिहेरी भूमिका पार पाडत तिने कुटुंबाचा गाडा हाकला. आता चाकण येथील नामांकित कंपनीत आठ लाखांचे पॅकेज मिळवत ती उच्च शिक्षणही घेत आहे. ही कथा आहे देहूतील हर्षदा राहुल सोनवणे हिची.
मूळचे सातारा येथील सोनवणे कुटुंबीय नव्वदच्या दशकात कामानिमित्त देहूत आले. हर्षदा आणि तिच्या लहान बहिणींचाही जन्म इथलाच. देहूतील कन्या विद्यालयात तिचे शिक्षण झाले. २०१५ ला दहावी झाली. चांगल्या ठिकाणी नोकरी करायची तिचे स्वप्न होते. त्यातच वडिलांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे शिक्षण व घर सांभाळणे कठीण जात होते. पुढील शिक्षणासाठी पैसे नव्हते. मात्र, शिक्षणाचा खर्च देहूतील ‘अभंग प्रतिष्ठान’ने करत कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्यामुळे ती शिक्षण करू शकली.
आई व बहिणीची जबाबदारी
वडिलांच्या निधनानंतर आईचे धैर्य खचले व आईला मानसिक आजार जडला. कुटुंबाची पूर्ण जबाबदारी तिच्यावरच आली. त्यातच शिक्षण सुरू असल्याने ती अर्धवेळ नोकरीही करत होती. त्यात घरखर्च भागवत असे. आता शिक्षण पूर्ण केल्यानंतर चाकण येथील नामांकित कंपनीमध्ये आठ लाखांचे पॅकेज घेत आहे. त्यातून ती बहिणीचे व स्वत:चे उच्चशिक्षण घेत आहे.
‘यू आर माय बॉय...’
आई-वडिलांना मी आणि माझ्यानंतर मुलगीच झाली. त्याचा कसलाही न्यूनगंड न बाळगता लहान असताना वडील नेहमी म्हणायचे ‘यू आर माय बॉय, यू आर माय प्राइड.’ त्यांच्या या वाक्याला मी साजेसे वागले असे वाटते. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत असल्याचा अभिमान आहे. - हर्षदा सोनवणे, देहू