लोकमततर्फे आयोजित स्वरचैतन्य मैफलीतून निरागस सुरांची अनुभूती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 01:46 AM2018-11-08T01:46:43+5:302018-11-08T01:47:12+5:30

दीपोत्सवातील लक्ष्मीपूजनाची बुधवारची पहाट शहरवासीयांसाठी अत्यंत आनंद देणारी ठरली. अभिजात शास्त्रीय संगीतातील अमोघ बंदिशी, राग दरबारी आणि नाट्यसंगीतातील लोकप्रिय रचना असा संगीतमय फराळ पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला.

The sensation of innocence from the Swatachayatanya concert organized by Lokmat | लोकमततर्फे आयोजित स्वरचैतन्य मैफलीतून निरागस सुरांची अनुभूती

लोकमततर्फे आयोजित स्वरचैतन्य मैफलीतून निरागस सुरांची अनुभूती

googlenewsNext

पिंपरी - दीपोत्सवातील लक्ष्मीपूजनाची बुधवारची पहाट शहरवासीयांसाठी अत्यंत आनंद देणारी ठरली. अभिजात शास्त्रीय संगीतातील अमोघ बंदिशी, राग दरबारी आणि नाट्यसंगीतातील लोकप्रिय रचना असा संगीतमय फराळ पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला. ‘लोकमत’ आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कारविजेते प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या स्वरचैतन्य मैफलीत रसिकांना निरागस सुरांची अनुभूती मिळाली.

‘लोकमत’ आयोजित युवराज ढमाले ग्रुप प्रस्तुत स्वरचैतन्य दिवाळी पहाट मैफल चिंचवड येथील शिवाजी उदय मंडळाच्या प्रांगणात अविस्मरणीय ठरली. या कार्यक्रमाचे प्रायोजक फिनोलेक्स पाईप व पीएनजी हे होते, तर सहयोगी प्रायोजक राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेज, काका हलवाई स्वीट सेंटर हे होते. सहयोगी प्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को आॅप. सोसायटी, बेव्हरेज पार्टनर ऊर्जा, आऊटडोअर पार्टनर धीरेंद्र अ‍ॅडव्हर्टायझिंग, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी हे होते.

लक्ष्मीपूजनाच्या बुधवारच्या पहाटे गुलाबी थंडीत महेश काळे यांची सुरांची मैफल सुरू झाली. मंचावर आकाशकंदील लावण्यात आले होते. तर मंचासमोर पणत्या पेटविल्या होत्या. हजारो दिव्यांनी परिसर उजळला होता. पहाटे पाचपासूनच रसिकांची मैदानावर गर्दी झाली
होती. मैफल सुरू होण्याच्या वेळी मैदान रसिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. अशा आनंददायी आणि आल्हाददायी वातावरणात मैफलीची सुरुवात झाली.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटाने घराघरांत पोहोचलेल्या राष्टÑीय पुरस्कारप्राप्त गायक महेश काळे यांच्या गायनाने मैफल अविस्मरणीय झाली. पुरुषोत्तम गांगुर्डे, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ते शिष्य असून, त्यांनी अनेक देशांत भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार केला आहे.

महेश काळे यांनी पूर्वार्धात शास्त्रीय गायन सादर केले. शुद्धकल्याण विभास रागात बंदीश सादर केली. त्यानंतर मुरलीधर शाम, सुरत पिया की, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे नाही पुण्याची मोजणी अशा रचना सादर केल्या. उत्तरार्धात नाट्यपदे सादर करून मैफल रंगतदार केली. ‘सूर निरागस हो....’ने मैफलीत बहार आणली.

रसिकांनी अक्षरश: टाळ्या वाजवीत ताल धरला होता. ‘मोरया मोरया’ गजराने मोरयानगरीत आसमंत दणाणला. शास्त्रीय संगीतातील राग दरबारी आणि नाट्यसंगीतातील लोकप्रिय रचनांचा फराळ शहरवासीयांना मिळाला. दोन तास सूरांच्या मैफलीची जादू चिंचवडकरांनी अनुभवली. तरुण-तरुणींची गर्दी लक्षणीय होती. सूरांच्या जादूगारांसमवेत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली होती. ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर...’, सर्वात्मका सर्वेश्वरा या भैरवीने मैफलीचा कलसाध्याय गाठला. भैरवीने मैफलीची सांगता झाली.
तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून महेश काळे यांनी तरुणाईशी संवाद साधला. ‘‘शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची मोहिनी दिवसेंदिवस वाढत आहे. लोकमतने या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल कोेमल साळुंखे यांनी समाधान व्यक्त केले. वैभव खांडोळकर (तबला), आेंकार दळवी (पखावज), राजीव तांबे (संवादिनी), राहुल गोळे (आर्गन) यांनी साथसंगत केली.


सेल्फी घेण्यासाठी गर्दी
चिंचवड हा परिसर रसिकप्रिय असून, काळे यांच्या दिवाळी पहाट मैफलीस रसिकांची अलोट गर्दी झाली होती. रसिक मिळेल त्या ठिकाणी बसले होते. हजारो रसिक उभे राहून मैफलीचा आनंद घेत होते. रसिकांमध्ये लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठांचाही समावेश मोठा होता. त्यावरून तरुणाईला काळे यांच्या गायनाची मोहिनी आहे, याची प्रचिती येत होती. सेल्फी घेण्यासही गर्दी झाली होती.

लोकमत ‘दीपोत्सव’चे लोकार्पण

स्वरचैतन्य दिवाळी पहाट कार्यक्रमांच्या मध्यांतरात मान्यवर व कलावंतांचा गौरव करण्यात आला. महापौर राहुल जाधव, मंगलाताई जाधव, महापालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे, अजय गोखले, राणी पुतळाबाई वुमन लॉ कॉलेजचे संचालक कोमल साळुंखे, अजय साळुंखे, फिनोलेक्सचे उपाध्यक्ष अजय गोखले, रोझरी स्कूलचे संचालक विनय अºहाणा, लोकमान्य मल्टिपर्पज बँकेच्या सुजाता बर्वे, लोकमतचे उपमुख्य उपसंपादक हणमंत पाटील,शाखा व्यवस्थापक मयूर केमसे आदी उपस्थित होते. या वेळी लोकमत दीपोत्सव दिवाळी अंकाचे लोकार्पण महापौर जाधव आणि महेश काळे यांच्या हस्ते केले. ओंकार दीक्षित यांनी सूत्रसंचलन केले.

दिवाळीला विविध रूचकर फराळाचा अनुभव मिळतो. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुरेल स्वरांचा फराळ लोकमतने पिंपरी-चिंचवडकरांना दिला.
- युवराज ढमाले, अध्यक्ष,
युवराज ढमाले कॉर्प

लोकमतच्या वतीने दिवाळी पहाट हा चांगला उपक्रम राबविला त्यातून सांस्कृतिक चळवळला चालना मिळेल, असे उपक्रम राबविण्याची गरज आहे. - प्रकाश छाब्रिया,
अध्यक्ष,
फिनोलेक्स इंडस्ट्रीज

लोकमतच्या वतीने सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकी दिवाळी पहाट हा उपक्रम होता. हा उपक्रम चांगला होता. त्यास रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. - सौरभ गाडगीळ,
अध्यक्ष, पीएनजी ज्वेलर्स

दिवाळीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडकरांसाठी संगीताचा अनोखा नजराणा लोकमतने दिला. हा उपक्रम स्तुत्य आहे. त्यास रसिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. त्याबद्दल धन्यवाद. अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याची गरज आहे. त्यातून शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण होईल.
- सिद्धार्थ गाडवे, काका हलवाई स्वीट सेंटर

दिवाळी हा दिव्यांचा महोत्सव असतो. यंदाची दिवाळी पिंपरी-चिंचवडकरांसाठी विशेष महत्त्वाची असेल. स्वरांचा दिवाळी फराळ अनुभवायला मिळाला. - विनय अºहाणा,
रोजरी स्कूल

Web Title: The sensation of innocence from the Swatachayatanya concert organized by Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.