पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता केलं दुसरं लग्न; पतीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 19:03 IST2022-05-07T17:00:00+5:302022-05-07T19:03:52+5:30
पत्नीची फसवणूक, मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता केलं दुसरं लग्न; पतीवर गुन्हा दाखल
पिंपरी : पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला. दुसऱ्या पत्नीच्या नावे दोन बँकांमधून कर्ज घेतले. दुसऱ्या पत्नीला चाकूने मारहाण करून घरातून निघून जाण्यास भाग पाडले. तिचा सोन्याचा नेकलेस परत न करता त्याचा अपहार केला. या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णू वामन ठाकरे (वय ५२) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी दुसऱ्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३१ जुलै २०२० ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत पाथरूट, ता. अचलपूर, जि. अमरावती येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेता फिर्यादीसोबत विवाह केला. फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्याच्या हेतूने फिर्यादी आणि त्यांच्या आईला अकोला मध्यवर्ती बँक आणि अकोला अर्बन बँकेतून दोन लाख ३० हजार रुपये कर्ज काढण्यास भाग पाडले. ती रक्कम पतीने स्वतःकडे घेतली. ते पैसे परत न करता फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला चाकूने मारहाण करून घरातून निघून जाण्यास भाग पाडले. फिर्यादीचा घेतलेला दोन तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस परत न करता अपहार करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.