पिंपरी - चिंचवडच्या अपर पोलीस आयुक्तपदी डॉ. संजय शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 13:03 IST2021-08-26T13:03:02+5:302021-08-26T13:03:09+5:30
संजय शिंदे यांनी रत्नागिरी, कल्याण, सातारा, लातूर, चंद्रपूर अशा शहरांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केले आहे

पिंपरी - चिंचवडच्या अपर पोलीस आयुक्तपदी डॉ. संजय शिंदे
पिंपरी : शहराचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर येथे बदली झाली. त्यांच्या जागी वर्णी लागलेले डॉ. संजय शिंदे यांनी पिंपरी- चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. शहराचे पहिले अपर पोलीस आयुक्त म्हणून मकरंद रानडे यांनी जबाबदारी सांभाळली. दहा महिन्यात त्यांची पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर अमरावती परिक्षेत्र येथे बदली झाली. त्यानंतर रामनाथ पोकळे यांनी मे २०१९ रोजी शहराचे अपर पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. आयुक्तालयातील कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांची ठाणे शहर येथे बदली झाली. त्यामुळे पुणे शहर येथील डॉ. संजय शिंदे यांची अपर आयुक्त म्हणून वर्णी लागली.
रामनाथ पोकळे यांनी सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचा धडाका लावला होता. तसेच मोक्कांतर्गत देखील मोठी कारवाई केली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांनी त्यांची धास्ती घेतली होती. अशीच धडाकेबाज कारवाई नवे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडून अपेक्षित आहे.
डॉ. संजय शिंदे यांची शांत व संयमी अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळख आहे. त्यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. रत्नागिरी, कल्याण, सातारा, लातूर, चंद्रपूर अशा शहरांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केले आहे. आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात देखील त्यांनी प्रमुख पदांची धुरा सांभाळली आहे. उल्लेखनीय कार्याबद्दल शासनाच्या विशेष पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केले आहे.
नव्या उपायुक्तांची प्रतीक्षा
पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची पदोन्नतीने पुणे शहरात पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली झाली. मात्र त्यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही वर्णी लागलेली नाही. त्यामुळे नव्या उपायुक्तांची प्रतीक्षा आहे. नवे उपायुक्त उपलब्ध होऊन रुजू होत नाहीत तोपर्यंत सुधीर हिरेमठ यांच्याकडेच पदभार राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.