देखावे पाहून रात्री परतताय? १२ वाजेपर्यंत मेट्रोची आहे सोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 14:24 IST2023-09-19T14:23:51+5:302023-09-19T14:24:52+5:30
पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो...

देखावे पाहून रात्री परतताय? १२ वाजेपर्यंत मेट्रोची आहे सोबत
पिंपरी :पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे यावर्षी प्रथमच मेट्रो रेल्वेने जोडली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून पुणे शहरातील गणपती पाहण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मेट्रो प्रशासनाने गणेशोत्सव काळात मेट्रो मध्यरात्री १२ पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी लाखो रुपये खर्च करून पुण्यातील गणेश मंडळ जिवंत देखावे आणि देशातील विविध देवांची मंदिरं साकारण्याचा प्रयत्न करतात. पुण्यातील जिवंत देखाव्यांची देशभरात वेगळीच ओळख आहे. हे सगळे देखावे पाहण्यासाठी उपनगरातून व बाहेरगावाहून नागरिकसुद्धा शहराच्या मध्यवर्ती भागात येत असतात. देखावे रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्यामुळे नागरिकांना बऱ्याच वेळा घरी जाण्यासाठी खासगी कॅब किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. यात बऱ्याच वेळा नागरिकांची आर्थिक लूट होण्याची शक्यता असते.
नागरिकांना रात्री उशिरा प्रवासाची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मेट्रो प्रशासनाने गणेशोत्सव काळात म्हणजेच २२ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत आणि विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच २८ सप्टेंबरला सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत मेट्रो सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.