सेवानिवृत्त उच्च पदस्थ अधिकाऱ्याला एक कोटी १२ लाखांचा गंडा
By नारायण बडगुजर | Updated: February 15, 2025 12:13 IST2025-02-15T12:13:01+5:302025-02-15T12:13:08+5:30
व्हेन्टारस कंपनीमधून वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून बोलणाऱ्या व्यक्ती

सेवानिवृत्त उच्च पदस्थ अधिकाऱ्याला एक कोटी १२ लाखांचा गंडा
पिंपरी : उच्चपदस्थ अधिकारी म्हणून खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला गुंतवणुकीवर खात्रीशीर परताव्याचे आमिष दाखवले. गुंतवणूक करण्यास भाग पाडून एक कोटी १२ लाख ९६ हजार ३८० रुपयांची फसवणूक केली. थेरगाव येथे १ ऑक्टोबर २०२४ ते १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीचा हा प्रकार घडला.
थेरगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाने याप्रकरणी शुक्रवारी (दि. १४ फेब्रुवारी) याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. व्हेन्टारस कंपनीमधून वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून बोलणाऱ्या व्यक्ती, अकाउंट व्यवस्थापक अबु बाकर, रोहन अग्रवाल, सपोर्ट ग्रुप जोसेफ, ईरिका व्ही नावाने बोलाणारे संशयित तसेच वेगवेगळ्य बँकेचे खातेधारक असलेल्या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका खासगी कंपनीतून उच्चपदस्थ अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. संशयितांनी फिर्यादी यांना वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून व्हेन्टारस कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या व्हेन्टारस कंपनीमार्फत फाॅरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यानंतर खात्रीशीर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या व्हेन्टारस कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करण्यास व त्यावर फाॅरेक्स ट्रेडिंगकरता नमूद बँक खात्यांवर एकूण एक कोटी ३० हजार २३ लाख ५१५ रुपये भरण्यास भाग पाडले. त्यामधील २१ लाख ९१ हजार १३५ रुपये यूसडीटीमार्फत परत दिले. परंतु दिलेल्या रकमेतील चार लाख ६४ हजार रुपयांचे लिन लागल्याने त्यांनी उर्वरित रक्कम एक कोटी आठ लाख ३२ हजार ३८० रुपये व लिन रक्कम चार लाख ६४ हजार रुपये असे एकूण एक कोटी १२ लाख ९६ हजार ३८० रुपयांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे तपास करीत आहेत.