महापालिकेची नोकरी नको रे बाबा! ६१ जणांनी दिले राजीनामे

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 24, 2024 18:35 IST2024-12-24T18:33:56+5:302024-12-24T18:35:32+5:30

प्रतीक्षा यादीतील ३५ उमेदवारांना करून घेतले रुजू

Resignations of 61 newly recruited employees in the municipal service | महापालिकेची नोकरी नको रे बाबा! ६१ जणांनी दिले राजीनामे

महापालिकेची नोकरी नको रे बाबा! ६१ जणांनी दिले राजीनामे

पिंपरी : महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. विविध ११ पदांच्या ३७१ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यात पात्र झालेले उमेदवार रूजूही झाले. मात्र, त्यातील ६१ कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले असून, सद्य:स्थितीत ३७१ पैकी ३२० कर्मचारी रूजू आहेत, तर प्रतीक्षा यादीतील ३५ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना रूजू करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात सर्वाधिक २१३ जागा लिपिक पदासाठी होत्या, तर सगळ्यात कमी ॲनिमल किपर या पदासाठी एक जागा होती. यातील काही जागांमध्ये आरक्षणानुसार अर्ज आले नव्हते. त्यामुळे त्या जागा रिक्त ठेवाव्या लागल्या, तर निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने पत्रव्यवहार करून बोलावून घेतले. निवड झालेल्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले; मात्र त्यातील २९ लिपिक, ४ कनिष्ठ अभियंता, २७ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, १ समाजसेवक पदावर रुजू झालेल्या ६१ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता. तो आयुक्त शेखर सिंह यांनी मंजूर केला. त्यांच्या जागीही प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे.

ॲनिमल किपरसाठी अर्जच नाही

ॲनिमल किपर या पदासाठी महापालिकेने नोकर भरतीत अर्ज मागविले होते. मात्र, ज्या संवर्गासाठी अर्ज मागविण्यात आले, त्यासाठी एकही अर्ज न आल्याने ते पद रिक्त ठेवण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे.

पदनाम - पदसंख्या - राजीनामा मंजूर संख्या - रुजू संख्या - प्रतीक्षा यादीतील बोलविलेले उमेदवार

कनिष्ठ अभियंता - ४८ - ४ - ४७ - १

कनिष्ठ अभियंता (विद्युत) - १८ - ०० - १८ -००

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक - ७४ - २७ - ६८ - ०६

ॲनिमल किपर - ०१ - ०० - ०० - ००

आरोग्य निरीक्षक - १३ - ००- ७ - ६

लिपिक - २१३ - २९ - १७६ - २१

कोर्ट लिपिक - २ - ०- २- ०

समाजसेवक - २ - १ - २ - १

एकूण - ३७१ - ६१ - ३२० - ३५

इतर ठिकाणी चांगली संधी...

राज्य शासनाच्या इतर विभागांत चांगल्या पदावर संधी मिळाल्याने महापालिकेची नोकरी नाकारली आहे, तसेच काही पदांच्या संवर्गातील अर्ज न आल्याने ती पदे रिक्त आहेत. तर, राजीनामा दिलेल्या पदांवरील जागांवर प्रतीक्षा यादीतील इतर उमेदवारांना संधी देण्यात येत आहे. - विठ्ठल जोशी, उपायुक्त, महापालिका

Web Title: Resignations of 61 newly recruited employees in the municipal service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.