त्रिवेणीनगर झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन; पण समस्यांचा डोंगर; सहाशे कुटुंबांतील तीन हजार नागरिकांचे वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:40 IST2025-10-09T11:35:33+5:302025-10-09T11:40:00+5:30
सहाशे कुटुंबांतील तीन हजार नागरिकांचे वास्तव्य : समस्यांचा डोंगर; इमारतींची कामे दर्जाहीन; पाण्याचा तुटवडा, स्वच्छतेचे प्रश्न गंभीर; सूर्यप्रकाश व रस्ता नसल्याने अनेक गाळेही बंद

त्रिवेणीनगर झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन; पण समस्यांचा डोंगर; सहाशे कुटुंबांतील तीन हजार नागरिकांचे वास
- रामहरी केदार
चिखली : त्रिवेणीनगर येथील शरदनगर झोपडपट्टी व दुर्गानगर झोपडपट्टीतील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी शरदनगर येथील भूखंडावर बारा मजली इमारती उभ्या करण्यात आल्या. त्यात सहाशे कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. काहींना दुकाने देण्यात आली आहेत, मात्र त्यांना मूलभूत सुविधा योग्यप्रकारे मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
या प्रकल्पात दोन वेगवेगळ्या इमारती असून, एकात दुर्गानगर झोपडपट्टीतील रहिवासी व एकात शरदनगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले. या ठिकाणी शेकडो कुटुंबांचे वास्तव्य आहे. इमारतींच्या कामाची गुणवत्ता योग्य नसल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रहिवाशांच्या मुलांसाठी तळमजल्यावर अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे, परंतु लहान मुलांसाठी योग्य स्वच्छतागृह नसल्याने अंगणवाडी कर्मचारी व मुलांची कुचंबणा होत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कचरा व्यवस्थापन, सांडपाणी विल्हेवाटीबाबत समुपदेशन गरजेचे
या प्रकल्पात अंदाजे तीन हजार नागरिकांचे वास्तव्य आहे. प्रामुख्याने कष्टकरी व रोजंदारी करणाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना मूलभूत सुविधा म्हणून कचरा व्यवस्थापन, सांडपाणी विल्हेवाट, आरोग्य व शिक्षणासारख्या गोष्टींविषयी समुपदेशन करणे गरजेचे आहे.
घरांमध्ये पाण्याची गळती
इमारतींचे हस्तांतरण केल्यापासून वरच्या मजल्यावरील घरांमध्ये पाण्याची गळती होत आहे. यासंदर्भात विकसकाला वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. अनेक ठिकाणी सेफ्टी ग्रील नसल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या आहेत मुख्य समस्या...
घरांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा नाही.
पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तळमजल्यावर व कमी उंचीच्या. मैलामिश्रीत पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता.
सांडपाणी प्रक्रिया केंद्र अस्तिवात असूनही पुनर्वापरासाठी येणारे पाणी दुर्गंधीयुक्त.
पार्किंग परिसरात मैलामिश्रीत पाणी साचल्याने दुर्गंधी.
सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या भूमिगत वाहिन्या कमी क्षमतेच्या.
तळमजल्यावरील दुकानांकडे योग्य सूर्यप्रकाश व रस्ता नसल्याने अनेक गाळे बंद.
काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. ज्या त्रुटी दिसून आल्या, त्या संदर्भातील दोषनिवारण करण्यात येईल व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रहिवाशांचे समुपदेशन करण्याचे नियोजन आहे. - सतीशकुमार खडके, मुख्य अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
प्रकल्पात दोन ठिकाणच्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, सुविधा मिळत नसल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. प्रकल्प विकसक व अधिकाऱ्यांनी रहिवाशांच्या समस्या समजून घेणे गरजेचे आहे. - योगिता नागरगोजे, माजी नगरसेविका