डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेसच्या जनरल बोगी कमी केल्याने प्रवाशांचे हाल
By नारायण बडगुजर | Updated: September 12, 2022 14:51 IST2022-09-12T14:51:48+5:302022-09-12T14:51:59+5:30
दोन्ही गाड्यांना डबे पूर्ववत करण्याची मागणी

डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेसच्या जनरल बोगी कमी केल्याने प्रवाशांचे हाल
पिंपरी : मध्य रेल्वेच्या मुंबई - पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन व सिंहगड एक्सप्रेस या गाड्या मुंबई - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमानी आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी जीवन वाहिन्या आहेत. मात्र या गाड्यांच्या जनरल बोगी कमी केल्याने या प्रवाशांचे हाल होत आहेत. या गाड्यांच्या बोगींची संख्या वाढवून डबे पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
रेल्वे प्रवाशी सघटना पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे संघटनेचे अध्यक्ष इकबाल मुलाणी यांनी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना याबाबत निवेदन दिले आहे. डेक्कन क्वीन व सिंहगड एक्सप्रेस एलएचबी कोचसह नव्या स्वरुपात सुरू केल्या आहेत. मात्र, या दोन्ही गाड्यांचे जनरल डबे कमी केल्यामुळे अनारक्षित तिकीटधारकांची मोठी गैरसोय होत आहे. डेक्कन क्वीनला एकच जनरल डबा असल्यामुळे, या डब्यामध्ये उभे रहाणेही मुश्कील होते. त्यामुळे तिकीटधारकांना आरक्षित डब्यांमधून प्रवास करावा लागतो. त्यामुळे आरक्षित तिकीटधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो. यातून प्रवाशांमध्ये वाद होतात.
सिंहगड एक्सप्रेस मार्च, २०२० पर्यंत १९ डब्यांची होती. त्यानंतर २१ मार्च २०२२ पर्यंत १६ डब्यांची होती. सध्याची ही गाडी १४ डब्यांची असून दोन जनरल डबे कमी केले आहेत. डेक्कन क्वीन एक्सप्रेसची एक जनरल बोगी कमी केली आहे. या दोन्ही गाड्या प्रामुख्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आहेत. या दोन्ही गाड्यांना जनरल डबे (बोगी) कमी केल्यामुळे, अनारक्षित तसेच आरक्षित तिकीटधारकांचा प्रवास अतिशय त्रासदायक होत आहे. ते टाळण्यासाठी या दोन्ही गाड्यांना पूर्वीप्रमाणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसला एक जनरल डबा आणि सिंहगड एक्सप्रेसला दोन जनरल डबे जोडावेत, अशी मागणी निवेदनातून केली आहे.