श्रद्धेला अर्थ आहे की नाही? महाकुंभमेळ्यावरून राज ठाकरे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 06:29 IST2025-03-10T06:29:25+5:302025-03-10T06:29:25+5:30
देशातील एकही नदी स्वच्छ नाही - राज ठाकरे

श्रद्धेला अर्थ आहे की नाही? महाकुंभमेळ्यावरून राज ठाकरे यांची टीका
पिंपरी (जि. पुणे) :मनसेच्या बैठकीस काही जण गैरहजर होते. मी त्यांची हजेरी घेतली. तर त्यांनी सांगितले, कुंभला गेलो होतो. त्यावर मी त्यांना म्हटले, करता कशाला पापं. कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमधील पाणी दिले. ते म्हणाले, पिणार का? मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही, असे परखड मत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. पिंपरी- चिंचवड येथे मनसेच्या १९व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते.
महाराष्ट्राचा चिखल झालाय !
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा चिखल झालाय, राजकारणी एकमेकांची डोकी फोडायला लावताहेत. प्रभू रामचंद्र यांना १४ वर्षाचा वनवास झाला.
त्या कालखंडात रावण सीताहरण, रावण वध, राम सेतू बांधला हे सगळे त्यांनी १४ वर्षांत केले आणि आपल्याकडे सी लिंक बांधायला १४ वर्षे लागली. हे सगळे मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलणार आहे.
सगळीकडे राजकीय फेरीवाले
सगळीकडे राजकीय फेरीवाले आले, तसे आपण नाहीत. इकडून डोळा मारला की तिकडे, तिकडून डोळा मारला की दुसरीकडे. आपण असे फेरीवाले नाहीत. आपण अख्खे दुकान उभे करू, असे ते म्हणाले.
'जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आले नाही'
पुढील १०० वर्षांत मराठे जगात पहिल्या क्रमांकावर जातील, असे इतिहास संशोधक जदुनाथ सरकार यांनी सांगितले होते. मात्र, तसे झाले नाही. कारण, जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आलेले नाही.
आजवर इतिहासात सर्व जाती एकत्र आल्या म्हणून विजय मिळवू शकले. जातींचे ऐक्य नष्ट झाले की, राज्य संपले. उत्तरपेशवाईसारखी स्थिती आज महाराष्ट्रात आहे, असे मत अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरे यांच्या हस्ते डॉ. मोरे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर 'महाराष्ट्र काल आज आणि उद्या' या विषयावर डॉ. मोरे यांनी व्याख्यान दिले.