लक्ष्मीपूजनानंतर विकेंडच्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात वाढला पर्यटकांचा ओघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 14:16 IST2025-10-26T14:15:54+5:302025-10-26T14:16:04+5:30

- पुणे, मुंबईसह गुजरातमधून पर्यटक दाखल; शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी, लोणावळ्यासह कार्ला, मळवलीतील बंगले, रिसॉर्ट फुल्ल

pune news tourist influx in Lonavala increased due to weekend holidays after Lakshmi Puja | लक्ष्मीपूजनानंतर विकेंडच्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात वाढला पर्यटकांचा ओघ

लक्ष्मीपूजनानंतर विकेंडच्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात वाढला पर्यटकांचा ओघ

नितीन तिकोने

लोणावळा : दिवाळी सण संपताच पर्यटननगरी लोणावळ्यात पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. दिवाळीच्या सलग सुट्या व आलेला विकेंड यामुळे गुजरात मुंबईसह महाराष्ट्रातून तसेच देशाच्या अनेक भागांतून सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात मोठ्या संख्येने शनिवारी दाखल झाले होतो. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

विकेंडला मोठ्या प्रमाणावर पर्यटक फिरायला घराबाहेर पडल्याने लोणावळ्यात शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती. सर्वत्र पर्यटकांची वर्दळ दिसू लागल्याने व्यावसायिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. लोणावळ्यात दिवसा पाऊस, तर रात्री गारठा जाणवू लागला आहे. त्यामुळे थंडीचा आनंद घेण्यात पर्यटक रमू लागले आहेत.

पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरासह कार्ला मळवली या ग्रामीण भागातील बहुतांश सर्वच हाॅटेल, बंगलो पर्यटकांनी भरले आहेत. पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांनी गजबजली आहेत. सर्वत्र चैतन्याचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. वाहतूक पोलिस मात्र वाहनांची कोंडी सोडविण्यासाठी चौकात काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लोणावळा शहरासह महाबळेश्वर कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. त्याचबरोबर लोणावळा शहरातील मुख्य चौक तसेच बाजारपेठेतही वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली.

व्यावसायिकांनी खबरदारी घ्यावी

अनेक पर्यटक वाहने रस्त्यावर उभी करणे, अथवा वाहतूक नियमांचा भंग करणे, विरुद्ध दिशेने वाहने घेऊन येणे असे प्रकार करत आहेत. हे सर्व प्रकार नियमांचा भंग करणारे असल्याने व वाहतूक कोंडीत भर घालणारे असल्याने वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी, तसेच व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोरील वाहनांमुळे वाहतूक समस्या निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.

Web Title: pune news tourist influx in Lonavala increased due to weekend holidays after Lakshmi Puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.