आळंदी : वडील ऊसतोड कामगार आणि आई रस्त्यावरील खोदकाम करणारी मजूर... घरात शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नाही आणि राहण्यासाठी तांड्यावरील झोपडी. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून गरिबीचे चटके सोसत परभणी जिल्ह्यातील एका तरुणाने यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे. आळंदीत वारकरी शिक्षण घेणाऱ्या ज्ञानेश्वर रामराव चव्हाण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात १२वा क्रमांक पटकावून कनिष्ठ स्तर न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे ऊसतोड कामगाराचा मुलगा आता न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसणार असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील गणेशनगर तांडा येथील रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वर चव्हाण यांचा प्रवास सोपा नव्हता. गावात प्राथमिक शिक्षणाची सोय नसल्याने आणि घरची आर्थिक ओढाताण असल्याने त्यांच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होता. मात्र, शिक्षणाची ओढ पाहून त्यांना आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेत पाठवण्यात आले. येथेच त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जिद्दीच्या जोरावर पुण्यातून वाणिज्य शाखेची पदवी आणि विधी शाखेचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाचा खर्च पेलण्यासाठी त्यांनी खासगी ठिकाणी काम करून पैसे जमवले आणि त्यातून पुस्तके खरेदी केली. आईचा आधार आणि स्वतःची चिकाटी कमी पडू न देता त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात हे देदीप्यमान यश संपादन केले.
कुटुंबातील पहिलीच 'दहावी पास' व्यक्ती आता न्यायाधीश
चव्हाण यांच्या कुटुंबात शिक्षणाशी कोणाचाही दुरान्वये संबंध नव्हता. कुटुंबात दहावीची पायरी चढणारे ज्ञानेश्वर हे पहिलेच सदस्य होते. आज त्याच कुटुंबातील मुलगा राज्याच्या गुणवत्ता यादीत बारावा येत न्यायाधीश झाला आहे. ‘आई-वडिलांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांचे पाठबळ यांमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो,’ अशी भावना चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
Web Summary : Overcoming poverty and lack of education, a sugarcane worker's son from Parbhani secured 12th rank in the MPSC exam, becoming a judge. Gyaneshwar Chavan, educated at Alandi's Warakari Sansthan, exemplifies dedication, funding his studies through part-time work. He's the first in his family to pass tenth grade.
Web Summary : ग़रीबी और शिक्षा की कमी को पार करते हुए, परभणी के एक गन्ना श्रमिक के बेटे ने एमपीएससी परीक्षा में 12वां स्थान प्राप्त किया और जज बन गया। आलंदी के वारकरी संस्थान में शिक्षित ज्ञानेश्वर चव्हाण ने अंशकालिक नौकरी के माध्यम से अपनी पढ़ाई का खर्च उठाया। वह अपने परिवार में दसवीं पास करने वाले पहले व्यक्ति हैं।