रोहोकडी शिवारात थरार; विहिरीतून बिबट्याचा बछडा सुखरूप बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:24 IST2025-09-20T17:24:00+5:302025-09-20T17:24:17+5:30
विहिरीत हा बिबट्याचा बछडा पडल्याचे आढळले. ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली.

रोहोकडी शिवारात थरार; विहिरीतून बिबट्याचा बछडा सुखरूप बाहेर
ओतूर : रोहोकडी (ता. जुन्नर) येथील शिवशेत शिवारातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभाग, रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या थरारक रेस्क्यू ऑपरेशनमुळे बछड्याला जीवदान मिळाले.
शुक्रवारी सकाळी शेतकरी उल्हास गणपत घोलप आणि सचिन गणपत घोलप यांच्या विहिरीत हा बिबट्याचा बछडा पडल्याचे आढळले. ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा येथील रेस्क्यू टीम मधील रोहित बोडके, अमोल भुतांबरे, रोशन नवले आणि चिल्हेवाडीचे वनरक्षक कांचन ढोमसे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक सरपंच सुभाष घोलप यांच्यासह कैलास मुरादे, शांतराम मुरादे, अरुण मुरादे, रोहिदास घोलप, दत्तात्रय मुरादे, सचिन मुरादे, शाम हिंगणे, बाजीराव घोलप, ज्ञानेश्वर घोलप, शांताराम शिंदे, अजिंक्य मुरादे, विष्णू मुरादे, निखिल घोलप, अमोल मुरादे, भाऊसाहेब मुरादे, विलास मुरादे, महेश मुरादे, योगेश घोलप, वैभव केदारी, नीतेश घोलप, पोपट हिंगणे, सतीश घोलप, मयुरेश घोलप, प्रणव मुरादे आदी ग्रामस्थांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोलाचे सहकार्य केले. दुपारी दोनच्या सुमारास बछड्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. वनविभागाच्या माहितीनुसार, हा बछडा अंदाजे १ ते १.५ वर्षांचा आहे. भक्षाच्या शोधात असताना तो विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. बछड्याला प्राथमिक उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.