उद्योगनगरीतील उद्योगांची वाट ‘ट्रम्प टेरिफ’मुळे बनली खडतर;अमेरिकेच्या आयात शुल्काचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 15:01 IST2025-08-03T15:01:27+5:302025-08-03T15:01:45+5:30
- : निर्यात घटण्याची भीती, स्पर्धेत टिकण्यासाठी नवी आव्हाने; वाहनांचे सुटे भाग, अभियांत्रिकी साहित्य, प्लास्टिक व्यवसायाला सर्वाधिक फटका बसणार

उद्योगनगरीतील उद्योगांची वाट ‘ट्रम्प टेरिफ’मुळे बनली खडतर;अमेरिकेच्या आयात शुल्काचा परिणाम
- गोविंद बर्गे
पिंपरी : अमेरिकेने काही भारतीय उत्पादनांवर २५ टक्के आयात शुल्क लागू केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यातील लघु व मध्यम उद्योगांवर मोठा परिणाम होणार आहे. उद्योगनगरीतील उद्योगांची वाट ‘ट्रम्प टेरिफ’मुळे खडतर बनली असून, अनेक निर्यातदार उद्योग अडचणीत सापडले आहेत. हजारो कामगारांच्या रोजी-रोटीवर गदा येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये औषधनिर्माण (फार्मास्युटिकल्स), वाहन निर्मिती आणि सुटे भाग, अभियांत्रिकी, प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उत्पादन व निर्यात व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. हे उद्योग बऱ्याचअंशी अमेरिकी बाजारपेठेवर अवलंबन असून, आयात शुल्क वाढीमुळे स्पर्धात्मकतेवर परिणाम होणार आहे. येथील लघुउद्योजकांवर आयात शुल्काचा थेट परिणाम जाणवू लागला आहे.
आयात शुल्क वाढल्यामुळे येथील मालाची किंमत अमेरिकी बाजारात वाढणार असून, स्पर्धेत टिकण्यात अडथळे येणार आहेत. परिणामी निर्यातीत घट होऊन उत्पादन कमी करावे लागणार आहे. त्याचा थेट परिणाम कामगार कपातीवर व आर्थिक उलाढालीवर होईल. अनेक उद्योग अर्धवट क्षमतेने चालण्याची वेळ येऊ शकते, ज्यामुळे रोजगाराच्या संधी घटून बेरोजगारी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, फार्मास्युटिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या काही क्षेत्रांना सुरुवातीला या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजक स्थानिक अर्थव्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यांना वाचविण्यासाठी सरकारने तातडीच्या उपाययोजना कराव्यात. केंद्र सरकारने सवलतीसाठी धोरणात्मक पातळीवर चर्चा, राज्यस्तरीय विशेष मदत योजना, निर्यातदारांसाठी अनुदान योजना व कर सवलती लागू कराव्यात. - अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन
औद्योगिक नगरीतून अमेरिकेत इंजिनिअरिंग साहित्याची निर्यात केली जाते. अमेरिकेने लागून केलेल्या २५ टक्के आयात शुल्कामुळे तेथील भारतीय उत्पादनांच्या किमतीत वाढ होणार आहे. त्याचा परिणाम भारताच्या व्यापारावर होणार आहे. मात्र, आपण स्पर्धेतून बाहेर पडू अशी परिस्थिती येणार नाही.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष- पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनाशहरातील उद्योगांकडून इंजिनिअरिंग, ऑटोमोबाइल, इलेक्ट्राॅनिक्स, रोबोटिक्स साहित्य अमेरिकेत निर्यात केले जाते. अमेरिकेतील आयात शुल्कवाढीचा त्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आगामी काळात रशिया, जर्मनीसह अन्य देशांमध्ये साहित्य निर्यातीचा विचार उद्योगक्षेत्राकडून केला जाईल. - गोविंद पानसरे, अध्यक्ष, मायक्रो, स्माॅल, मीडियम इंडस्ट्रीज फेडरेशन
भारत अमेरिकेला पॉलिमर्समधील औषधे, ऑटो पार्ट्स, इलेक्ट्रॉनिक्स आदी साहित्य मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. हे साहित्य अमेरिकेतील बाजारपेठेत महाग होणार असून, त्यांची स्पर्धात्मकता कमी होईल. इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपिन्ससारखे देश भारतीय निर्यातदारांना कडवी स्पर्धा देतील. अमेरिकेतील नवीन ऑर्डर्स सध्या स्थगित केल्या आहेत. दुसरीकडे, युरोपियन बाजारपेठेत चिनी मालाच्या वाढत्या प्रमाणामुळे भारतीय कंपन्यांचा नफा आधीच घटलेला आहे. - नितीन गट्टानी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड प्लॅस्टिक असोसिएशन
आयात शुल्क वाढविल्याने निर्यातीत घट झाल्यास संबंधित उद्योगांमधील रोजगार कमी होण्याची शक्यता आहे. कारण कंपन्या उत्पादन कमी करू शकतात किंवा कामगार कपात करू शकतात. - रेश्मा मुल्ला, उपाध्यक्षा, महिला लघुउद्योजक संघटना