चिंचवड रेल्वेस्थानकाजवळचा पूल पाडून नवीन उभारणार;वाहनचालकांसाठी प्रवास होणार अधिक सुलभ आणि सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 14:58 IST2025-08-30T14:57:49+5:302025-08-30T14:58:07+5:30

- मुंबई-पुणे महामार्गावर महावीर चौकातून चिंचवड गावाकडे जाणारा डाव्या बाजूचा रेल्वे उड्डाणपूल १९७६ मध्ये बांधण्यात आला होता.

pune news the bridge near Chinchwad railway station will be demolished and a new one will be built; travel will be easier and safer for drivers | चिंचवड रेल्वेस्थानकाजवळचा पूल पाडून नवीन उभारणार;वाहनचालकांसाठी प्रवास होणार अधिक सुलभ आणि सुरक्षित

चिंचवड रेल्वेस्थानकाजवळचा पूल पाडून नवीन उभारणार;वाहनचालकांसाठी प्रवास होणार अधिक सुलभ आणि सुरक्षित

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्याऐवजी नवीन उड्डाणपूल बांधण्यास मान्यता दिली आहे. तज्ज्ञांच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालांवर आणि रेल्वे विभागाच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. येथे जुना पूल पाडून नवीन पूल उभारल्याने येथील प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर महावीर चौकातून चिंचवड गावाकडे जाणारा डाव्या बाजूचा रेल्वे उड्डाणपूल १९७६ मध्ये बांधण्यात आला होता. या पुलाच्या उजव्या बाजूला समांतर उड्डाणपूल २००४ मध्ये बांधण्यात आला आहे. तर, १९७६ मध्ये बांधण्यात आलेला जुना पूल स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कमकुवत असल्याचे आढळून आले. या ऑडिटच्या अहवालानंतर महापालिकेने जुन्या पुलावर हलकी वाहने आणि दुचाकी वगळता इतर वाहनांना जाण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे येथून जाणारी जड वाहने आणि बसेस यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर, संबंधित पूल पाडून त्याजागी नवीन पूल बांधण्याबाबत महापालिकेद्वारे विविध संस्थांकडून तांत्रिक आढावा घेण्यात आला. २०२१ मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आणि २०२२ मध्ये पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या पुनर्विलोकनानुसार जुना पूल पाडण्याची शिफारस करण्यात आली. त्यानंतर रेल्वे विभागाने डिसेंबर २०२४ मध्ये जुना रेल्वे उड्डाणपूल पाडण्यासाठी आणि नवीन पुलाच्या आधुनिक पुनर्बांधणीसाठी संमती दिली. यासंबंधी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला ४ मार्च रोजी कार्यादेश देण्यात आला. त्यामुळे आता लवकरच येथील जुना पूल पाडून नवीन पूल उभारला जाणार आहे.

चिंचवड स्टेशनजवळील जुन्या उड्डाणपुलाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. तज्ज्ञांच्या मूल्यांकनातून आणि नागरिकांचा अभिप्राय लक्षात घेऊन येथे नवीन पूल उभारण्यात येणार आहे. रेल्वे विभागाची यासाठी मंजुरी मिळाली असून येथे नवीन पूल उभारण्यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे.  – शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

Web Title: pune news the bridge near Chinchwad railway station will be demolished and a new one will be built; travel will be easier and safer for drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.