पगार न मिळाल्याने टीसीएस कर्मचाऱ्याचे कंपनीसमोरच झोपून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:41 IST2025-08-05T19:41:29+5:302025-08-05T19:41:57+5:30
या कर्मचाऱ्याचे नाव सौरभ मोरे असून, त्याचा फुटपाथवर झोपलेला फोटो आणि हाताने लिहिलेली नोट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल

पगार न मिळाल्याने टीसीएस कर्मचाऱ्याचे कंपनीसमोरच झोपून आंदोलन
पिंपरी: टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) कंपनीतील एका कर्मचाऱ्याने पगार न मिळाल्याच्या निषेधार्थ थेट हिंजवडी येथील कार्यालयाबाहेर झोपून आंदोलन सुरू केल्याची घटना समोर आली आहे.
या कर्मचाऱ्याचे नाव सौरभ मोरे असून, त्याचा फुटपाथवर झोपलेला फोटो आणि हाताने लिहिलेली नोट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. या घटनेवर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावर नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
मोरे यांनी आपल्या नोटमध्ये नमूद केले आहे की, ते २९ जुलैपासून ऑफिसमध्ये रिपोर्ट करत आहेत, मात्र त्यांचा ओळखपत्र सक्रिय नसल्यामुळे काम सुरू करता येत नाही आणि पगारही मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना फुटपाथवरच राहावे लागले, असे त्यांनी दावा केला आहे.
या प्रकाराबाबत टीसीएसने स्पष्टीकरण देताना सांगितले की, संबंधित कर्मचाऱ्याची काही काळ अनधिकृत अनुपस्थिती होती. त्यामुळे नियमानुसार त्याचा पगार रोखण्यात आला होता. मात्र आता संबंधित कर्मचाऱ्याशी संपर्क साधण्यात आला असून, त्याला तात्पुरती निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे