लाल सिग्नल लय मोठा,वाहनांच्या लांबलचक रांगा;पिंपळे सौदागरमध्ये वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 15:49 IST2025-08-03T15:49:23+5:302025-08-03T15:49:34+5:30
रहदारीच्या वेळी वाहतूक कोंडी : सिग्नलची वेळ जास्त असल्याने वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण; यशदा चौक, पी. के. चौकात वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी, वाहनांमुळे जीव गमाविण्याची वेळ

लाल सिग्नल लय मोठा,वाहनांच्या लांबलचक रांगा;पिंपळे सौदागरमध्ये वाहतूक कोंडी
- महादेव मासाळ
पिंपळे सौदागर : येथील पी. के. चौक येथील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. कोसळणारा पाऊस आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे पिंपळे सौदागरकरांसह प्रवासी वाहनचालक हैराण झाले आहेत. लाल सिग्नल जास्त सेकंदाचा आणि हिरवा सिग्नल तुलनेत खूपच कमी सेकंदाचा असल्याने वाहनचालक सिग्नल मोडून सुसाट वाहने दामटवत आहेत. परिणामी, अपघात होत आहेत. नुकतेच शुक्रवारी (दि. १) येथील रस्त्यावर डम्परखाली चेंगरून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पिंपळे गुरवहून गोविंद यशदा चौकमार्गे वाकडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी व सायंकाळच्या वेळेस होणारी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. या चौकात जास्त सेकंदाचा लाल सिग्नल असल्याने वाहनांच्या रांगा लागतात. त्याचा परिणाम, पी. के. चौकात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे. या चौकात लाल सिग्नल १०८ सेकंदाचा असून हिरवा सिग्नल केवळ ६५ सेकंदाचा आहे. जवळपासून दोन मिनिटे वाहनाचालकांना या सिग्नलला उभे राहावे लागते.
एकीकडे वरून बरसत असलेला पाऊस अन् कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने वाहने पुढे दामटविणारे वाहनचालक आणि दुसरीकडे तर मुलांना शाळेत वेळेवर पोहोचवण्यासाठी व परत आणण्यासाठी पालकांची होत असलेली घालमेल यामुळे अनेकदा वाहनचालक सिग्नल मोडून वाहने पुढे दामटवतात. त्यामुळे अपघात होऊन अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. सिग्नल सुटल्यानंतर तर, सिग्नल पुन्हा लागण्याच्या आत पुढे जाण्यासाठी वाहनचालकांची जणू शर्यत सुरू असल्याचे येथे पाहायला मिळते.
लाल सिग्नल खूप वेळ असल्याने वाहनचालकांना सिग्नल तोडण्याची सवय लागलेली आहे. अपघात रोखण्यासाठी कारवाई गरजेची आहे. कुंदा भिसे, सामाजिक कार्यकर्त्या, पिंपळे सौदागर
चौकाचा आराखडा चुकीचा तयार केला आहे. येथे उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे. तरच कोंडीतून मुक्तता होईल. प्रशासन, वाहतूक पोलिसांनी याबाबत काम करणे गरजेचे आहे. जगन्नाथ काटे, अध्यक्ष, पी. के. स्कूल, पिंपळे सौदागर
सिग्नल यंत्रणेचे, वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने वाहनांचा वेग कमी असतो, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. खासगी शाळांच्या व्यवस्थापनासही स्कूल व्हॅनमुळे वाहतूक कोंडी होणार नाही, याविषयी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, सांगवी
मुख्य रस्त्यावर येथे दुतर्फा वाहने उभी केलेली असतात. पिके चौक तसेच कोकणे चौकात लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी तसेच वाहतूक वॉर्डन नेमल्यास समस्या सुटू शकते. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय करावेत.
संदीप काटे, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळे सौदागर
पिंपळे सौदागरमधील चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. अवजड वाहनांवर व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात यावी. नाना काटे माजी विरोधी पक्षनेते परिसरात अनेक शाळा आणि बँका पी. के. चौक परिसरात शाळा, चारहून अधिक बँका आणि हजारो विद्यार्थी राहतात. पिंपळे गुरवमार्गे वाकड व हिंजवडीकडे जाणारा रस्ता असल्याने रहदारी असते, असेही कुंदा भिसे म्हणाल्या.