पडळकरांच्या भाषेचे समर्थन कोणीही करणार नाही; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 18:27 IST2025-09-21T18:26:51+5:302025-09-21T18:27:34+5:30

- विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि त्यांच्या आईंवर बोललेले चालते

pune news no one will support Padalkars language chandrakant Patil | पडळकरांच्या भाषेचे समर्थन कोणीही करणार नाही; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले

पडळकरांच्या भाषेचे समर्थन कोणीही करणार नाही; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वापरलेल्या भाषेचे समर्थन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी किंवा भाजपचा अन्य कोणताही नेता करणार नाही. मात्र, टाळी एका हाताने वाजत नाही हेदेखील खरे आहे. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि त्यांच्या आईंवर बोललेले चालते, त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीवर देखील ते बोलतात, तेव्हा विरोधकांनीदेखील तारतम्य बाळगणं आवश्यक आहे, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विरोधक आणि सत्ताधारी या दोघांकडूनही तारतम्य बाळगण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

भाजपचे आमदार पडळकर यांनी जतमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याचे तीव्र पडसाद गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर उमटत आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, राजकारणामध्ये शिवराळ भाषेचा ट्रेंड गेल्या चार-पाच वर्षांमध्ये पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवराळ भाषा वापरायला लोकांना काही वाटेना झाले आहे. शिवराळ भाषा वापरली म्हणजे आपल्या म्हणण्याला जोर येतो, असे काहीसे त्यांना वाटतेय का? असा प्रश्न पडत आहे.

या गोष्टीतून पडळकर यांचे मला समर्थन करायचे नाही. मात्र, गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर विरोधकांनीही आपल्या बोलण्यावरती कंट्रोल करणे आवश्यक आहे. पडळकर यांना अशी भाषा वापरू नये असे सांगण्यात आले आहे. गोपीचंद पडळकर हे आमचे आज्ञाधारक कार्यकर्ते असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सूचना दिल्यानंतर आता त्यांच्या ध्येयबोली आणि भाषेमध्ये फरक पडेल, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: pune news no one will support Padalkars language chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.